निवडणूक न लढवण्याचा पवार यांचा निर्णय

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

(संग्रहित छायाचित्र)

मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी

माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत महिनाभरापूर्वी देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूकच लढणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले.

एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यामुळे आणि नव्या पिढीला संधी देण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

सत्ताधारी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पवार यांनी गेल्या महिन्यात माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत पुण्यातूनच दिले होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी सोलापूर जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी पुण्यात घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

माढा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्याबाबत मी सकारात्मक होतो. मावळमधून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. शेतकरी कामगार पक्षानेही पार्थ यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे एका कुटुंबातील किती उमेदवार द्यायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर चर्चा करून मी हा निर्णय घेतला, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, ‘माझी राज्यसभेची मुदत संपण्यास दोन वर्षे आहेत. या परिस्थितीत निवडणुकीला उभे न राहता नव्या पिढीला संधी देणार आहे. मी आतापर्यंत १४ निवडणुका लढविल्या आहेत. माझा एकदाही पराभव झालेला नाही, हा इतिहास पाहता निवडणुकीला सामोरे जाण्यास आवडले असते. मात्र एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, याबाबत मर्यादा असाव्यात. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे.’

पवारांची विधाने

८ फेब्रुवारी २०१९ : माढा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक नाही. मात्र त्यांच्या आग्रहाचा मी नक्की विचार करेन.

११ मार्च २०१९ : घरातील किती जणांना उमेदवारी द्यावी, याबाबत मर्यादा हवी. पार्थ पवार मावळमधील उमेदवार असतील. त्यामुळे माढातून मी निवडणूक लढणार नाही. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार लोकसभेचे उमेदवार असतील.

..मग माढातून कोण?

निवडणुकीच्या रिंगणातून पवार यांनी माघार घेतल्यामुळे माढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. परंतु, येत्या दोन दिवसांत माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे.

यादी दोन दिवसांत!

माढा मतदारसंघासंदर्भात मी प्रत्येकाशी वैयक्तिक आणि सामूहिक संवाद साधला. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय जाहीर करतील. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात येईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Will not contest elections says pawar

ताज्या बातम्या