आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणणार असल्याचे काँग्रेस नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बुधवारी पुण्यात इंडिअन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

थोरात म्हणाले, जे पक्ष संविधानी प्रक्रियेचा आदर करतात तसेच धर्मनिरपेक्षतेला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात जे आहेत अशा सर्व पक्षांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी, पक्षांतर्गत नाराजींबाबत भाष्य केले. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भुमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनासोबत घेतानाचे नियोजन कसे असेल याबाबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली.

‘लोकसभेच्यावेळी आम्ही वंचितला सोबत घेतले नाही. त्यामुळे आम्हाला ९ जागा गमवाव्या लागल्या. मात्र, यावेळी आम्ही वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच मनसेबाबत बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, त्यावेळी राज्यात काँग्रेससोबतच्या युतीबाबत चर्चा झाली नव्हती केवळ ईव्हीएमबाबत चर्चा त्यांनी केली होती. मनसेकडून आघाडीत सामिल होण्याबाबत अद्याप कुठलाच प्रस्ताव आलेला नाही, असा प्रस्ताव आल्यास तो आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवू,’ असे यावेळी थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसमधील अंतर्गत वादावर बोलताना थोरात म्हणाले, हे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आणि संघटनांमध्ये सुरु असते. मात्र, काँग्रेससाठी हा मोठा प्रश्न नाही. जे काही छोटे-मोठे वाद असतील ते आम्ही आपसात चर्चा करुन सोडवू. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाची प्रक्रिया सुरु झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय यायला अजून वेळ लागणार आहे कारण, आघाडीत येणाऱ्या इतर सहकारी पक्षांनाही काही जागा द्याव्या लागणार आहेत.