गोदामाची भिंत फोडून साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्या लंपास; सासवड रस्त्यावरील घटना

गोदामाची भिंत फोडून चोरट्यांनी साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविल्याची घटना उघडकीस आली.

गोदामाची भिंत फोडून साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्या लंपास; सासवड रस्त्यावरील घटना
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

पुणे : गोदामाची भिंत फोडून चोरट्यांनी साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविल्याची घटना उघडकीस आली. सासवड रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत वाईन एंटरप्रायजेस प्रा. लि. चे संतोष केशवे (वय ३३, रा. शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासवड रस्त्यावरील वडकी, ऊरळी देवाची, मंतरवाडी भागात गोदामे आहेत. गोदामांमध्ये विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक केली जाते.

सासवड रस्त्यावरील श्रीनाथ एंटरप्रायजेस गोदामात केशवे यांच्या कंपनीच्या वाईनची खोकी ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी गोदामाची भिंत मध्यरात्री फोडली. गोदामातील वेगवेगळ्या कंपनीच्या वाईनच्या बाटल्या खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविली. चोरट्यांनी १२ लाख ६५ हजारांचे बाटल्या लांबविल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चाेरट्यांनी गोदामातील सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारी डीव्हीआर यंत्रणा लांबविली असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

भिंत फोडून चोरीची चौथी घटना

शहरात दुकानांची भिंत फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चार महिन्यांपूर्वी वारजे भागातील सराफी पेढीची भिंत फोडून चोरट्यांनी एक कोटी रुपयांचे दागिने लांबविले होते. त्यानंतर सोमवार पेठेतील एका मोबाइल शाॅपीची भिंत फोडून चोरट्यांनी ५५ लाखांचे मोबाइल संच लांबविले होते. आठवड्यापूर्वी उंड्री भागातील एका सराफी पेढीची भिंत फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता. सासवड रस्त्यावरील गोदामाची भिंत फोडून वाईनच्या बाटल्या लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी (९ ऑगस्ट) उघडकीस आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wine bottles stolen breaking warehouse wall saswad road incident pune print news ysh

Next Story
पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग ; हडपसर भागातील शाळेतील घटना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी