मंगळवापर्यंत गारठाच

पुण्यात गुरूवारी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. शहराचे रात्रीचे तापमान गुरूवारी ८ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून या दिवशी राज्यात पुणे आणि नाशिकमध्येच सर्वात कमी तापमान होते.

पुणे आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी गुरूवारी ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या मोसमातील पुण्यातील हे नीचांकी तापमान आहे. यापूर्वी ११ डिसेंबरला पुण्यातील तापमान ८.३ अंशांवर आले होते.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) गुरूवारी संध्याकाळी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पुण्याची हुडहुडी अशीच राहणार आहे. शुक्रवारीही शहराचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअसवरच राहण्याची शक्यता असून शनिवारी ते ७ अंशांवर उतरेल. त्यानंतरही मंगळवापर्यंत तापमान ८ अंशच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बालकांमध्ये गॅस्ट्रो आणि ‘सेकंडरी’ जीवाणू संसर्ग वाढला

रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील फरक लहानग्यांसाठी त्रासदायक ठरताना दिसत आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ललवाणी म्हणाले,‘‘तापमानातील चढउतारांमध्ये खोकला, सर्दी आणि तापासारखे विषाणू संसर्ग वाढतात आणि त्याच्या काही रुग्णांना ‘सेकंडरी’ जीवाणू संसर्गही होतो. अशा बालरुग्णांची संख्या वाढली आहे. बाह्य़रुग्ण विभागात गॅस्ट्रो किंवा ‘विंटर डायरिया’ झालेली दोन वर्षांच्या खालची बाळेही येत आहेत.

गेल्या १०-१२ दिवसांत डोळे येण्याचेही (कंजंक्टिव्हायटिस) रुग्ण बघायला मिळाले. हा आजार सहसा थंडीत दिसत नाही.’’

बाळांना होणाऱ्या ‘विंटर डायरिया’वर ‘रोटाव्हायरस’ लस दिली जाते, तर विषाणू संसर्गानंतरचा ‘सेकंडरी’ जीवाणू संसर्ग टाळण्यासाठी ‘हिब व्हॅक्सिन’ (हिमोफिलिस एन्फ्लूएन्झा- टाईप बी) दिली जाते. तसेच न्यूमोनियाच्या जंतूमुळे होणाऱ्या पाच प्रकारचे संसर्ग टाळण्यासाठी ‘न्यूमोकोक्कल’ लशीचा फायदा होतो, असेही डॉ. ललवाणी यांनी सांगितले.

दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील मोठा फरक कायम

आता दिवसाही गारठा जाणवू लागला असला तरी दिवसा व रात्री नोंदल्या जाणाऱ्या तापमानात मात्र २१.५ अंश सेल्सिअसचा फरक आहे. गेले काही दिवस सातत्याने कमाल व किमान तापमानात २० अंश किंवा त्यापेक्षा जास्त फरक राहतो आहे. ‘आयएमडी’च्या हवामान विभागाचे प्रमुख पी. के. नंदनकर म्हणाले,‘‘पुण्याच्या भौगोलिक स्थानामुळे येथे दिवसा व रात्रीच्या तापमानात जास्त फरक दिसतो. उत्तरेकडील राज्यांमध्ये अशी परिस्थिती नसते. तिथे दिवसाचे तापमानही खूप कमी असते. आपल्याकडे मात्र त्यात मोठा फरक राहात असल्यामुळे तो खूप जाणवण्याजोगा असतो.’’