यंदाही थंडीला दिवाळीनंतरचा मुहूर्त ; पावसाचा कालावधी वाढत असल्याने परिणाम

१५ नोव्हेंबरनंतर काही प्रमाणात थंडीचा कालावधी सुरू होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

पुणे : ऋतुचक्रानुसार पावसाचा हंगाम संपून थंडीचे दिवस सुरू झाले असले तरी यंदाही थंडीला दिवाळीनंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातून निघून गेले आहेत. मात्र, समुद्रांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने पावसाचा कालावधी वाढत आहे. त्यातूनच हा परिणाम दिसून येत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरच्या मध्यानंतरच थंडी वाढू शकेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी हंगाम समजला जातो. ऑक्टोबरपासून तांत्रिकदृष्ट्या थंडीचा हंगाम सुरू होतो. याच महिन्यांत सुरुवातीला तापमानवाढीचाही कालावधी असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या ऋतुचक्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली. पाचच दिवसांत त्याने संपूर्ण राज्य व्यापून देशाच्या इतर भागांत प्रवेश केला. राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास तब्बल १९ दिवस उशिराने सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रातून नियोजित वेळेपूर्वी एक दिवस आधीच १४ ऑक्टोबरला मोसमी वारे माघारी गेले. त्यानंतरही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा पाऊस तुरळक ठिकाणी १८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता.

पावसाचा हा लांबलेला कालावधी गेल्या काही वर्षांमध्ये ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता कमी करण्यासह थंडीचा कालावधी कमी करीत असल्याचे दिसून येत आहे. यंदाही पाऊस लांबला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होऊन तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र, तापमानवाढ अतितीव्र राहणार नसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. या कालावधीत थंडी नसेल. अगदी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत चांगली थंडी अवतरणार नाही. १५ नोव्हेंबरनंतर काही प्रमाणात थंडीचा कालावधी सुरू होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

हवामान बदलांमुळे दिवाळीत थंडी अवतरण्याचा कालावधी आता राहिला नाही. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमधील तापमानवाढीची तीव्रताही कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचा कालावधी वाढत चालला आहे. त्यामुळे थंडी अवतरण्याचा कालावधी पुढे जातो आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता यंदाही नोव्हेंबरच्या मध्यानंतर थंडी वाढू शकेल. नोव्हेंबरच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळेही थंडीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Winter season after diwali due to rains duration increase zws

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या