पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक केंद्रात महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार आणि त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात विप्रो कंपनीतील माजी महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतराचा दबाव आणण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावर विप्रो कंपनीने अखेर खुलासा केला आहे.

आयटी कंपन्यांतील कार्पोरेट जिहादवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. टीसीएसच्या नाशिकमधील कार्यालयात हा प्रकार सर्वप्रथम उघडकीस आला होता. या प्रकरणी कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे. आता विप्रो कंपवनीच्या हिंजवडी आयटी पार्कमधील कार्यालयातील माजी महिला कर्मचाऱ्याचे प्रकरण पुढे आले आहे. या महिलेने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. या प्रकरणी तिने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

या प्रकरणी अखेर विप्रो कंपनीने खुलासा केला आहे. विप्रोने म्हटले आहे की, कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्व दिले जाते. कोणत्याही गैरप्रकाराला थारा न देण्याचे आमचे धोरण आहे. कोणतेही गैरवर्तन, भेदभाव, छळवणूक अथवा व्यक्तीच्या मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टींनी कंपनीत स्थान नाही. आम्ही या प्रकरणात तपास यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. याबाबतची सर्व कागदपत्रे आम्ही पोलिसांकडे सादर केली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणावर आम्ही भाष्य करू शकत नाही. आम्ही कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण देण्यास कटिबद्ध आहोत.

नेमका प्रकार काय?

विप्रो कंपनीत काम करत असताना या तक्रारदार महिलेच्या वैयक्तिक आयुष्यात एका मुस्लिम महिला सहकाऱ्याने जाणीवपूर्वक हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. या सहकारी महिलेने तिच्या ओळखीच्या एका मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याबरोबरच हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरला. त्याला नकार दिल्यामुळे माझ्या विरोधात खोटी तक्रार कंपनी व्यवस्थापनाकडे करण्यात आली. कंपनी व्यवस्थापनानेतील काही मुस्लिम व्यक्तींनी माझ्या सहकाऱ्याची बाजू घेत माझ्यावर एकतर्फी कारवाई केली. मला कोणतीही पूर्वसूचना न देता, नैसर्गिक न्याय डावलून माझा राजीनामा घेण्यात आला, असा दावा पीडितेकडून करण्यात आला.

पोलिसांकडे तक्रार

यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधित कंपनीलाही वकिलांच्या माध्मयातून नोटीस बजाविण्यात आली आहे. हा कार्पोरेट जिहादचा प्रकार असून हा प्रकार सहन केला जाणार नाही. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी आणि या कंपनीमध्ये असे आणखी काही प्रकार घडले असल्यास त्याची चौकशी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.