पिंपरी-चिंचवड शहरात दुधाची मोकळी पिशवी द्या आणि झाडांची आवडती रोपे घेऊन जा असा एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. झिरो प्लास्टिक अशी या मागची संकल्पना असून मंगळवारपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला शहरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी तीन हजार दुधाच्या पिशव्या जमा झाल्या असून दीडशे झाडं या उपक्रमाद्वारे नागरिक घेऊन गेले आहेत. हा उपक्रम पुढील पंधरा दिवस सुरू राहणार असून प्रतिसाद पाहता आणखी कालावधी वाढवण्याचा आयोजकांचा मानस आहे.

इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने आणि दीपक सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. विशेष म्हणजे दीपक सोनवणे यांची ११ एकरात नर्सरी असून जमा केलेल्या दुधाच्या मोकळ्या पिशव्या रोपांसाठी वापरल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राबविला जात असून १९ ठिकाणी दुधाच्या मोकळ्या पिशव्यांचं संकलन केले जात आहे. प्रत्येकी दुधाच्या मोकळ्या पिशवीला ४० पैसे दर आहे. त्यानुसार, काही दुधाच्या मोकळ्या पिशव्या आणि रोख रक्कम देऊन हवी ती झाडं नागरिकांना घेता येणार आहेत. झाडांची किंमत २५ रुपयांपासून सुरू आहे. त्यात वेगवगेवळ्या ४० विविध जातीची झाड आहेत. दरम्यान, प्रत्येकाच्या घरी दुधाची पिशवी घेतली जाते. मात्र, दूध भांड्यात ओतून घेतल्यानंतर दुधाची पिशवी कचऱ्यात फेकली जाते. त्यातून पर्यवरणाचा ऱ्हास अटळ आहे. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, तीच पिशवी पुन्हा वापरात आणल्यास निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून वाचवू शकतो, असं मत दीपक सोनावणे यांनी व्यक्त केलं.

जाणून घ्या वेगवेगळ्या जातीची नेमकी झाडे कोणती?

गोकर्ण पांढरा/ निळा, आंबेमोहोर बासमती, गवती चहा, कढीपत्ता, कृष्ण तुळस, पुदिना, गुलाब देशी/ काश्मिरी, रातराणी, मोगरा, निशिंगन्ध, शेवंती, कापूर तुळस, सब्जा, कोरफड, लसूण, अडूळसा यांच्यासह ४० वेगवेगळ्या जातींची झाड दुधाच्या मोकळ्या पिशवीचा मोबदल्यात मिळणार आहेत.

दुधाची मोकळी पिशवी कशी असावी

1) दुधाच्या मोकळ्या पिशव्या धुवून व सुकवून घ्याव्या लागणार आहेत.

2) पिशव्यांच्या बदल्यात झाडांची रोपे दिली जाणार.

3) दुधाच्या पिशवीची किंमत ४० पैसे/प्रति नग असेल.

4) रोपांच्या किंमतीतून पिशव्यांचे पैसे वजा केले जातील व उरलेली रक्कम अदा करावी लागणार आहे.

5) फुल झाडे, सुगंधी, आयुर्वेदीक आदी प्रकारातील निवडक झाडांचे रोपे मिळतील.

उपक्रम कुठे राबवला जाणार?

निगडी प्राधिकरण- आकुर्डी, कोथरूड (मयुरी कॉलनी), रावेत किवळे डी मार्ट जवळ, पर्वती, सहकार नगर, सिंहगड रोड, (पु.ल.देशपांडे उद्यान जवळ), बाणेर, पाषाण (गणराज चौक, साई चौक), वाकड, चिंचवड, पिंपरी , सांगवी (पीडब्ल्यू मैदान), औंध (श्री शिवाजी विद्यामंदिर समोर) कर्वेनगर, वारजे माळवाडी, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, कात्रज, नऱ्हे, आंबेगाव, चिखली, मोशी, शुक्रवार पेठ, पिंपळे सौदागर (कोकणे चौक)