कर्जबाजारीपणामुळे तिघांनी पिंपळे सौदागर येथील एटीएममध्ये भरणा करायला आणलेली ७४ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विठ्ठल जाधव, अमोल धुते आणि त्रिंबक नैरागे अशी मुख्य आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे तर चालक रणजित कोरेकर हा पसार झाला आहे. या सर्वांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही कर्जबाजारी होते आणि त्यांना मोठा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे त्यांनी ही चोरीची योजना आखली. विशेष म्हणजे त्यांनी चालकाला रक्कम न देता तिघातचं वाटून घेतली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल जाधव, अमोल धुते आणि त्रिंबक नैरागे तिघेही मुळचे बीडचे आहेत. ब्रिनक्स कंपनीत अमोल धुते याने १५ दिवस काम केले. कामाच्या ठिकाणची माहिती मिळवून त्याने तेथील काम सोडून दिले होते. तिनही संशयित आरोपी आणि चालक रणजित कोरेकर हे दिघी परिसरात राहत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. यातूनच विठ्ठल जाधव आणि अमोल धुते यांनी रक्कम लंपास करण्याची योजना आखली. यात रणजित कोरेकर याला सहभागी करून घेतले. रणजितला दारूचे व्यसन होते. ठरल्याप्रमाणे ३१ जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये रोखपाल आणि सुरक्षा रक्षक पैसे भरण्यासाठी उतरल्यानंतर वाहनचालक रणजित कोरेकर हा ७४ लाख ५० हजार रुपयांच्या रोकड वाहनासह घेऊन पसार झाला.

त्यानंतर अवघ्या काही तासातच ब्रिनक्स कंपनीची ते वाहन भोसरी येथे सापडले होते. वाकड पोलिसांनी अवघ्या ७२ तासांतच गुन्ह्याचा छडा लावत मुख्य आरोपींना गजाआड केले आहे. तिघाना बीड आणि औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६७ लाखाची रक्कम ताब्यात घेतली. उर्वरित पैसे त्यांनी मोबाईल, कपडे आणि पार्टीवर खर्च केले. मात्र ज्याने मेहनत घेतली त्याला एक रुपयाही न देता केवळ दारूवर हे काम तिघांनी करून घेतले. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.