पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन होत असलेल्या मारहाणीला वैतागून पतीचा खून करणाऱ्या महिलाला आंबेगाव पोलिसांनी वर्षभराने अटक केली. डोक्यात, शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करून पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक करण्यात आली.

वृषाली अजेंटराव (वय २४, रा. साहिल हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) असे अटक केलेल्या महिलेचा नाव आहे. अभिषेक अजेंट (वय २३) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना १० जुलै २०२४ रोजी दुपारी एक वाजता घडली होती. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक अजेंटराव हा एका खासगी कंपनीत काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. कारागृहातून तो गेल्या वर्षी सुटला होता. त्यानंतर वृषाली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता. वृषाली या एका ठिकाणी नोकरी करतात. १० जुलै २०२४ रोजी अभिषेक याने चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण केली. या प्रकाराने वैतागलेल्या वृषाली हिने त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने आघात केला. तसेच त्याच्यावर शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब समजल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. परंतु, डॉक्टरांना मृत्युचे नेमके निदान करता आले नाही. त्यांनी व्हिसेरा राखून ठेवला. पोलिसांनी अकस्मात मृत्यु झाल्याची तेव्हा नोंद केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘घटना घडली तेव्हा मी घरी नव्हते. पडून जखमी झाल्याने अभिषेकची मृत्यू झाला असावा’, असे वृषालीचे म्हणणे होते. अभिषेकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्याने नेमका कोणत्या कारणावरुन आणि कसा मृत्यू झाला, हे समोर येत नव्हते. आंबेगाव पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर हे प्रकरण आंबेगाव पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले. नुकताच याबाबतचा व्हिसेराचा अहवाल आला. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी वृषाली अजेंटराव हिच्याकडे पुन्हा चौकशी केली. त्यात तिने आपणच मारल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.