पुणे : सोसायटीच्या आवारात मुलीला कुत्रा चावल्याने तिच्या आईने आवारात फिरणाऱ्या दोन पिलांना काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत दोन्ही पिलांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिले विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी अनिता दिलीप खाटपे (वय ४५, रा. ग्रीन हाईव्ह सोसायटी, हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नीता आनंद बिडलान (वय ४३, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खाटपे यांची मुलगी सोसायटीच्या आवारातून जात होती. त्या वेळी तिला कुत्रे चावले. मुलीला कुत्रे चावल्यामुळे खाटपे यांना राग आला. त्यांनी सोसायटीच्या आवारात फिरणाऱ्या कुत्र्यांना मारते, असे म्हणत काठीने दोन पिलांना बेदम मारहाण केली.

पिलांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय रुग्णालयात करण्यात आले. मारहाणीत पिलांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर खाटपे यांच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार संतोष जोशी तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी गोखलेनगर भागात घरात शिरलेल्या पाळीव मांजराला एका महिलेने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेत मांजराचा मृत्यू झाला होता.