पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एका महिलेची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने महिलेचे पैसे देण्यास टाळाटाळ केली, तसेच मरण पावल्याचा बनाव केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी हर्ष भार्गव नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका महिलेने विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपी हर्ष भार्गवनेही संकेतस्थळावर नोंदणी केली होती. हर्षने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले आणि जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीविषयी माहिती देतो, असे सांगितले. त्याने नागपूरमधील एका बँकेत खाते उघडले.
महिलेला बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. महिलेने बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ९४ हजार रुपये जमा केले. बँक खाते संयुक्त होते. बँक खात्यात भार्गवने त्याचा मोबाइल क्रमांक दिला होता. त्याने महिलेच्या नावावर कर्ज काढले. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेशी संपर्क साधला.
महिलेने भार्गवच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइलवर बोलणाऱ्या व्यक्तीने भार्गवचा मृत्यू झाल्याची बतावणी महिलेकडे केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.