पुणे : गुंतवणुकीवर १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची एक कोटी चार लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पती-पत्नीसह तिघांवर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळे निलख येथे राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवाजी शिंदे (डीएसके विद्यानगरी, सूस-पाषाण), प्रियंका शिंदे (रा. धानोर, आष्टी) आणि मधुरा रोहन नंदुर्गी (रा. वाकड ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस आरोपींनी त्यांच्या स्क्रिसपिका ॲकॅडमी सर्व्हिसेस प्रा. लि. आणि पीएससीआय टेक या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास १८ टक्के परतावा मिळेल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी १ कोटी २४ लाख ४४ हजार रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरूपात दिले. तसेच १३ तोळे सोन्याचे दागिने विकून ६ लाख १४ हजार आणि ६० हजारांचा डेल कंपनीचा लॅपटॉप असे १ कोटी ३१ लाख ८८ हजार रुपये गुंतवले. त्याच्या मोबदल्यात २७ लाख ६३ हजार रुपये परतावा म्हणून देण्यात आले. उर्वरित मोबदला आणि गुंतवणूक केलेली रक्कम न देता एक कोटी चार लाख २५ हजारांची फसवणूक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके पुढील तपास करत आहेत.