scorecardresearch

विधवा महिलेचे हळदीकुंकू; सुवासिनींची आवर्जून उपस्थिती

कुटुंबातील सदस्यांनी खंबीर साथ दिल्याने आनंदी वातावरणात हळदीकुंकू पार पडले.

विधवा महिलेचे हळदीकुंकू; सुवासिनींची आवर्जून उपस्थिती
प्रीती आगळे-जगताप

कुटुंबातील सदस्यांच्या पाठबळामुळे महिलेचे धाडसी पाऊल

पिंपरी : विधवा महिलांनी सण, समारंभात का सहभागी होऊ नये, अशा कार्यक्रमांचे आयोजन का करू नये, अशाप्रकारच्या भावना व्यक्त करत पुनावळे (वाकड) येथील एका विधवा महिलेने धाडसाने हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. नात्यागोत्यातील महिलांसह तिच्या मैत्रिणींनी आवर्जून उपस्थित राहून एकप्रकारे पाठबळ दिले. कुटुंबातील सदस्यांनी खंबीर साथ दिल्याने आनंदी वातावरणात हळदीकुंकू पार पडले.

प्रीती आगळे-जगताप असे या उच्चशिक्षित महिलेचे नाव असून तिला दीड वर्षांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी ८ मे २०२१ रोजी करोनाच्या दुसऱ्या लाटेत तिच्या पतीचे, दीपक आगळे (वय ३६) यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी प्रीतीवर येऊन पडली, ती खंबीरपणे सांभाळत आहे. सुमारे १३ वर्षांपूर्वी प्रीतीच्या वडिलांचे निधन झाले होते. आईचे वैधव्य तिने डोळय़ासमोर पाहिले होते. समाजाकडून विधवेला कशा प्रकारची वागणूक दिली जाते, याचा अनुभवही तिने घेतला होता. दुर्दैवाने पतीच्या निधनानंतर तोच अनुभव तिच्याही वाटेला आला. सण, समारंभात सहभागी होण्याची आईची तीव्र इच्छा असायची. मात्र, समाज काय म्हणेल, या विचाराने ती तसे करू शकली नाही. आईला करता आले नाही, मग आपण करू शकतो का, त्यात चुकीचे काय आहे, या भावनेतून प्रीतीने संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम करण्याचा निर्धार केला. कुटुंबातील सदस्यांना तो बोलून दाखवला, मैत्रिणींचा सल्ला घेतला. सर्वानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने तिचा उत्साह दुणावला. त्यानंतर राहत्या घरीच तिने या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये सुवासिनी आनंदाने सहभागी झाल्या होत्या.

सणसोहळे फक्त सुवासिनींसाठीच का, असा प्रश्न माझ्या मनात लहानपणापासूनच येत होता. आईचे वैधव्य मी पाहिले होते. नवरात्रात नवमीच्या दिवशी सुवासिनींना भोजन दिले जाते. ते पाहून हा सोहळा फक्त सुवासिनींसाठीच का, असे वाटले. आपलेच सोहळे आपण साजरे का करू शकत नाही. मी हळदीकुंकू घेतले तर काय होईल, यावर विचार केला. सर्व निकटवर्तीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आनंदी वातावरण कार्यक्रम पार पडला. हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. – प्रीती आगळे-जगताप

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman courageous step with the support of family members zws

ताज्या बातम्या