पुणे : घरकाम करणाऱ्या महिलेने साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्यात ही घटना घडली.याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा धवलगिरी सोसायटीत बंगला आहे. त्यांनी घरकामासाठी एका महिलेला कामास ठेवले होते.
महिलेने ४ ते ५ जून या कालावधीत तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची नजर चुकवून शयनगृहातील कपाटात ठेवलेले दागिने लांबविले. शयनगृहातील कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. दागिने चोरणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.