पुणे : मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर डंपर आदळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत एका ५० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपरचालकाविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नंदा मालपोटे (वय ५०, रा. कातरखडक, ता. मुळशी जि. पुणे) असे मृत्यमुुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मालपोटे यांच्या मुलाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यात वर्तुळाकार मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी वाळू घेऊन निघालेल्या डंपरचालकाचे कातरखडक गावातील वळणावर नियंत्रण सुटले. वळणावर मालपोटे यांचे घर आहे. डंपर थेट घरात शिरला. डंपरच्या धडकेत भिंत कोसळली.
राडारोड्याखाली दबल्याने मालपोटे यांच्यासह आणखी एक महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राडारोड्याखाली अडकलेल्या मालपोटे यांच्यासह एका महिलेला बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मालपोटे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
लोहगाव परिसरात गोदामाला आग
लोहगाव-वाघोली रस्त्यावर असलेल्या एका गोदामास आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आगीत गोदामातील साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. लोहगाव-वाघोली रस्त्यावर बुधवारी दुपारी एका गोदामाला आग लागली. गोदामात फर्निचर, ऑईल, ग्रीस, तसेच वाहनाच्या सुट्या भागाचा साठा होता.
आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या धानोरी, खराडी, येरवडा केंद्रातील चार बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. गोदामात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. धानोरी अग्निशमन केंद्रातील प्रभारी अधिकारी सोपानदेव पवार, खराडी केंद्राचे उपअधिकारी दत्तात्रेय सातव, तांडेल सावंत, जवान सचिन जमदाडे, सपाटे, मुंगसे, कार्ले, नरके, जाधव, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवानांनी पाण्याचा मारा करून पाऊण तासात आग आटोक्यात आणली.

