पिंपरी : रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा हयगयीने चालवल्याने रिक्षा खड्ड्यात आपटली. त्यामध्ये रिक्षात बसलेल्या प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी थरमॅक्स चौकाजवळ निगडी येथे घडली. दरम्यान, शहरात सर्व भागातील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.
पार्वती गोविंद कल्याणकर (वय ५०, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी गोविंद माधवराव कल्याणकर (वय ५३, रा हडपसर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात येण्यात दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्वती कल्याणकर या १६ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक असा प्रवास करत होत्या. या प्रवासात रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा हयगयीने चालवली. त्यामुळे रिक्षा एका खड्ड्यात जोरदार आदळली. त्यामध्ये पार्वती या रिक्षातून बाहेर रस्त्यावर पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा…मूर्ती आमची, किंमत तुमची! वाचा कुठे आहे ‘हा’ उपक्रम
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सर्वच भागातील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. शहरात यंदा सर्वाधिक खड्डे असल्याचे प्रशासनाने मान्य केले होते. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने पुन्हा रस्त्यांची चाळन झाली आहे. आठवड्या भरात ८८८ खड्डे पडले आहेत. तर, आजपर्यंत ३५४२ खड्डे आढळले होते. त्यापैकी २८३८ खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा आहे. तर, ८०४ खड्डे बुजविणे बाकी आहे.