पुणे : कौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, खडकी बाजार पोलीस वसाहतीत ही घटना घडली.
या प्रकरणी योगेश माधव बेरी (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सहायक पोलीस निरीक्षक महिला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) नियुक्तीस आहेत. आरोपी बेरी हा खासगी कंपनीत नोकरी करत आहे. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. गेल्या काही महिन्यांपासून आराेपी पती महिला पाेलीस अधिकाऱ्याच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता.
महिला पोलीस अधिकारी खडकी बाजार पोलीस वसाहतीतील अधिकारी निवासस्थानात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोपी पती वेगळा राहत होता. त्याच्याकडे वसाहतीतील घराची चावी होती. एक चावी महिला अधिकाऱ्याकडे होती. २७ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिला पोलीस अधिकारी घरी परतल्या. आरोपी पती घरात लपून बसला होता. तेव्हा आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याच्य डोळ्यात राख फेकली. ओढणीने त्यांचा गळा आवळला. महिला पोलीस अधिकाऱ्याने आरडाओरडा केला. तेव्हा वसाहतीतील रहिवाशांनी तेथे धाव घेतली. रहिवाशांनी मध्यस्थी करुन पतीला पकडले. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे तपास करत आहेत.
जणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
जनगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. महिलेच्या मुलाला दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला कर्मचाऱ्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कर्मचारी २७ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वसाहतीतील गल्ली क्रमांक १४ येथे आरोपीच्या घरात त्या गेल्या. आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांची त्यांनी माहिती घेतली. महिलेबरोबर त्यांचा मुलगा होता. आरोपीचे वसाहतीत आणखी एक घर आहे. आरोपीने दुसऱ्या घरातील सदस्यांची नोंद करा, असे सांगितले. तेव्हा महिला कर्मचाऱ्याने त्या घराची नोंद झाली नसल्याचे त्यांना सांगितले. या कारणावरुन आरोपींनी महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून शिवीगाळ केली.
त्यानंतर जनगणनेच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी त्या गुरुवारी (२८ मे) दुपारी बाराच्या सुमारास गेल्या. आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने महिला आणि मुलाला शिवीगाळ केली. त्यांना मारहाण केली. महिला कर्मचाऱ्याच्या मुलाला दगडाने मारहाण केली. विनयभंग, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.
