पुणे : बिबवेवाडी भागात गुंगीचे औषध देऊन दोन महिलांकडील दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. आरोपी महिलेने दोन महिलांना काम मिळवून देण्याचे आमिष देऊन त्यांना चहातून गुंगीचे औषध देऊन दागिने लुटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीतील पापळ वस्ती परिसरात एका सोसायटीत राहायला आहे. १२ जून रोजी तक्रारदार महिला बिबवेवाडीतील भारत ज्योती सोसायटी परिसरातून दुपारी साडेबाराच्या सुमारास निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एका महिलेने तिला अडवले. महिलेला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरुन घरी नेले. महिलेला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडील दागिने आणि मोबाइल संच काढून घेतला.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांना २०२६ पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा? ‘या’ प्रकल्पाची रखडपट्टीच

हेही वाचा – पिंपरी: पोलीस शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी किती अर्ज? आजपासून भरतीप्रक्रिया

अशाच पद्धतीने बिबवेवाडी भागातील आणखी एका महिलेकडील दागिने चोरण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुंगीचे औषध देऊन दागिने चोरणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास करत आहेत.