पिंपरी-चिंचवडमध्ये ब्राऊन शुगर विकणाऱ्या महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. डिका थोरात, असं अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे महिला अवघ्या ८५ ग्रॅम वजनाच्या ब्राऊन शुगरमध्ये तब्बल ३१२ पुड्या बनवून ते विकत असे. ब्राऊन शुगर हे मुंबई मधून अण्णा स्वामी नावाच्या व्यक्तीकडून आणत असल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राऊन शुगर विकणाऱ्या महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिला डिका ही राहत्या घरातूनच ब्राऊन शुगर विकत असे. दरम्यान, तिने अवघ्या ८५ ग्रॅम वजनाच्या ब्राऊन शुगरमध्ये तब्बल ३१२ पुड्या बनवल्या होत्या, आणि त्या प्रत्येकी दीड ते दोन हजारांना विकत असे.

हेही वाचा- मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश! २,५०० कोटींच्या ड्रग्ससह ४ आरोपींना अटक

या प्रकरणात डिकाला तिची बहीण मदत करत होती, अस पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, ती फरार असून तीचा शोध पोलीस घेत आहेत. ब्राऊन शुगर हे मुंबईमधील कोळीवाडा सायन येथून आणलं होतं, अशी माहिती डिकाने पोलिसांना दिली आहे. आरोपी महिलेची माहिती पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांना मिळाली होती. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.