मुलीला बाळ व्हावं म्हणून तिची आई देणार स्वतःचं गर्भाशय; देशातील पहिलीच शस्त्रक्रिया

पुण्यातील रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालय

आई ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे असं म्हणतात. कारण आई-मुलाच्या नात्यात जितका मायेचा ओलावा तो इतर कोणत्याही नात्यात नसतो. आई होणं ही भावनाच अतिशय सुंदर असते. त्यामुळेच आपल्याला आई होता येणार नाही, ही भावना कोणत्याही महिलेसाठी अत्यंत दु:खद असते. आई न होण्याचं दु:ख काय असतं, याची कल्पना एखादी आईच करु शकते. त्यामुळेच आई न होऊ शकणाऱ्या मुलीचे दु:ख पाहून आईने तिला आपले गर्भाशय देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात यासाठीची शस्त्रक्रिया पार पडणार आहे. एका आईने आपले गर्भाशय मुलीला देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

बडोद्याच्या रुपल (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर शस्त्रक्रिया करुन गर्भाशयाचं प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. रुपल यांना त्यांच्या आईने गर्भाशय दिलं आहे. २६ वर्षांच्या रुपल यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. या काळात त्यांच्यावर अनेकदा रुग्णालयात उपचार झाले. रुपल दोन वेळा नऊ महिन्यांच्या गरोदरदेखील होत्या. मात्र त्या आई होऊ शकल्या नाहीत. याशिवाय चारवेळा त्यांना गर्भपातदेखील करावा लागला.

‘गेल्या काही वर्षांपासून इतकं सोसलंय की आता कशाचीच भीती वाटत नाही,’ असे रुपल यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना सांगितलं. तर ‘माझ्या मुलीला आई होता व्हावं, यासाठी शस्त्रक्रिया करत आहोत,’ असं रुपल यांच्या आईनं म्हटलं. गेल्या ८ वर्षांपासून रुपल यांना आई व्हायचं आहे. मात्र अद्याप त्यांची कूस रिकामीच राहिली आहे. आयुष्यात इतकं सारं वाईट घडत असताना रुपल यांच्या पतीने मात्र त्यांची साथ सोडलेली नाही. रुग्णालयांमधील उपचार, डॉक्टरांच्या भेटीगाठी यामध्ये रुपल यांचे पती त्यांच्या कायम पाठिशी आहेत.

रुपल यांच्यासोबतच सोलापूरमध्ये राहणाऱ्या स्वाती (वय २२) यांच्यावरदेखील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गर्भाशयाशिवाय जन्माला आलेल्या स्वाती यांच्यावर १९ मे रोजी गॅलेक्सी केअर रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ‘आम्हाला वाटलं की तिला मासिक पाळी येण्यात उशीर झाला आहे. मात्र तिच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी तिला गर्भाशय नसल्याचं सांगितलं. माझ्या गर्भाशयाचा काय उपयोग ? माझं गर्भाशय तिला दिलं तर तिला आई होता येईल,’ असे स्वाती यांच्या ४५ वर्षीय आईने बोलताना म्हटले.

‘दोनदा गर्भवती राहूनही मला आई होता आलं नाही. गर्भपातांनाही सामोरं जावं लागलं. मागील दोन वर्षांपासून मला मासिक पाळीदेखील आलेली नाही. या संपूर्ण काळातील माझी स्थिती, माझ्या वेदना पतीने पाहिल्या आहेत. त्यांनी मला नेहमीच खूप सहकार्य केलं आहे,’ असे स्वाती म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman to get her mothers uterus in indias first uterine transplant