पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गतवर्षीच्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये महिला अत्याचाराचे बाराशे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यात सर्वाधिक गुन्हे हे महिलांचा विनयभंग, छेडछाड आणि टिंगलीचे असल्याने पुण्यात हे प्रकार सर्रास होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढविली आहे. गेल्या वर्षभरात महिलांच्या संदर्भातील गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक महिला गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शहरात २०१४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान बाराशे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये विनयभंगाच्या ४०९ गुन्ह्य़ांचा समावेश आहे. त्याबरोबरच छेडछाडीचे ५९ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्य़ांबरोबरच हुंडय़ासाठी खून ६, हुंडय़ासाठी खुनाचा प्रयत्न ७, हुंडाबळी १७, हुंडय़ासाठी आत्महत्या ५०, बलात्कार १६५, अपहरण व पळवून नेणे ८७, पती किंवा नातेवाईकांकडून छळ ३४४ या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.
याबाबत स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष, आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, निर्भयाच्या घटनेनंतर महिला गुन्हे नोंदविण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे गुन्ह्य़ात वाढ झाली आहे.  पुण्यात बालकांवरील अत्याचार गुन्हे वाढत असल्याचे दिसत असून ही गंभीर बाब आहे. तसेच, महिलांसंदर्भातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असले तरी या गुन्ह्य़ात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. महिलांसदर्भातील गुन्हे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत.     

पोलीस काय करताहेत?
‘‘शहरात पोलिसांकडून महाविद्यालयाच्या परिसरात छेडछाडीच्या घटना होऊ नये म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरूच आहे. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. त्या ठिकाणी तीस महाविद्यालयांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अशा घटना घडू नयेत म्हणून सर्वतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये पालक, शिक्षक यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, यापुढे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई नक्की केली जाणार आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता.
या प्रकरणामुळेच पोलीस सहआयुक्त संजय कुमार यांनी आता दखलपात्र गुन्हे हे पोलीस ठाण्यातच नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. चौकीमध्ये फक्त अदखलपात्र गुन्हे नोदविले जातील, असे स्पष्ट केले आहे. चौकीत घडलेल्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता गंभीर प्रकाराची माहिती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना असायलाच हवी.’’
प्रकाश मुत्याळ (अतिरिक्त पोलीस आयुक्त, उत्तर विभाग)

मुख्यमंत्र्यांच्या आदेशापर्यंत कारवाई का नाही?
छेडछाडीला कंटाळून भोसरीतील युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांना कळवल्यानंतर त्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. या युवतीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस अंत्यसंस्कारासाठी घाई करत होते. युवतीच्या नातेवाईकांना धमकावत होते. या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. संबंधित तरुणी मृत पावल्यानंतर आता पोलीस कारवाईबाबत बोलत आहेत. म्हणजे, त्यासाठी तिच्या मरणाची वाट पाहिली जात होती का, असा प्रश्न निर्माण होतो.
या सर्व प्रकरणातील चौकशीला का वेळ लागला, दिरंगाई करणाऱ्या आणि यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांची कार्यपद्धती सुधारली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार महाविद्यालयात मुलांसाठी तक्रार पेटय़ा ठेवण्यात याव्यात, असे काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्याबरोबरच प्रत्येक महाविद्यालयात महिला कौन्सिलरची नेमणूक करावी. म्हणजे विद्यार्थिनींना त्यांच्या अडचणी व इतर गोष्टींची माहिती देण्यासाठी एक जागा मिळेल. मोशी येथील घटनेत एका मुलीचा बळी गेला नसून तो हजारो महिलांच्या हक्कांचा प्रतिकात्मक बळी आहे.
– डॉ. नीलम गोऱ्हे (आमदार व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष)

महाविद्यालये काय काळजी घेताहेत?
मॉडर्न महाविद्यालयात सुरक्षिततेसाठी परिसरात एकूण ४८ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. या कॅमऱ्यांच्या चित्रीकरणावर संपूर्ण दिवसभर लक्ष ठेवले जाते. त्याचे चित्रीकरण पाहण्याची सोय माझ्या कार्यालयात करण्यात आली आहे. विनयभंगाचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे फलक लावण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये असे चार फलक लावण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क ठेवून त्यांना महाविद्यालयात अचानक भेट देण्यास सांगितले आहे. त्यानुसार पोलीस भेट देऊन जातात. महाविद्यालयात सूचना पेटी बसविण्यात  आली आहे. तसेच, आवार सुरक्षा समिती, दक्षता समिती, आपत्ती व्यवस्थापन समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
– डॉ. आर. एस. झुंजारराव (प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय)