पुणे : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. कोलकत्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी दिली. ते म्हणाले की, महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या आवारात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे. याबाबत समिती नेमण्यात आली असून, ही समिती कॅमेरे बसविण्याची ठिकाणे निश्चित करेल. हेही वाचा >>> कर्वेनगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच सोसायटीतील चार सदनिका फोडण्याचा प्रयत्न महाविद्यालय आणि रुग्णालयाचे आवार खूप मोठे आहे. आपत्कालीन प्रसंगी अनेक महिला निवासी डॉक्टरांना रात्रीच्या वेळी एका विभागातून दुसऱ्या विभागात जावे लागते. या विभागांच्या इमारतींमधील अंतर अधिक आहे. यामुळे रात्रीच्या वेळी महिला सुरक्षारक्षक या डॉक्टरांसोबत असतील. याचबरोबर महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात सुरक्षारक्षक वेळोवेळी गस्त घालत आहेत. आवारात काही ठिकाणी पुरेसा उजेड नाही. अशा ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले. निवासी डॉक्टरांचा संप कोलकत्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी मार्डच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ५६६ निवासी डॉक्टरांपैकी ३८६ संपात सहभागी झाले असून, १८० कामावर आहेत. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या तपासणीसाठी इतर विभागातील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर फारसा परिणाम झालेला नाही, असे डॉ. पवार यांनी सांगितले. ससूनमधील १३ ऑगस्टची रुग्णसेवा (दुपारी २ पर्यंत) - रोजची सरासरी - मोठ्या शस्त्रक्रिया - २१ - ४८ - लहान शस्त्रक्रिया - ३८ - १४५ - प्रसूती - १२ - ३० निवासी डॉक्टरांचा संप सुरू राहिल्यास ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी पावले उचलली जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून त्यांच्याकडील डॉक्टरांची मागणी केली जाणार आहे. - डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय.