एचआयव्ही-एड्स, क्षयरोग आणि गुप्तरोग याविषयीच्या शंका दूर करून शास्त्रीय माहिती घेणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण २० टक्के, तर पुरुषांचे प्रमाण चौपट म्हणजे ८० टक्के आहे. यासाठी कार्यरत असलेल्या संवाद हेल्पलाईनशी आतापर्यंत दीड लाखांहून अधिक दूरध्वनी आले आहेत.
एचआयव्ही-एड्स, क्षयरोग, गुप्तरोग याविषयी समाजामध्ये अजूनही गैरसमज आहेत. योग्य माहितीचा अभाव आणि हे विषय लांछनाचे समजले गेल्याने मोकळेपणाने चर्चा होत नाही. हे ध्यानात घेऊन यासंदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे संवाद हेल्पलाईन ही टेलिफोनिक सेवा सुरू करण्यात आली आहे. घरामध्ये किंवा मित्रांशी ज्या विषयांवर चर्चा करता येत नाही अशा प्रश्नांना वाट मिळाली आहे. स्वत:ची ओळख न सांगतादेखील नेमकी माहिती आणि समुपदेशकांकडून योग्य सल्ला मिळतो.
संवाद हेल्पलाईनशी आतापर्यंत दीड लाखाहून अधिक दूरध्वनी आले आहेत. या हेल्पलाईनला गेल्या वर्षभरात महिलांचे दूरध्वनी २० टक्के आले असून पुरुषांचे दूरध्वनी येण्याचे प्रमाण चौपट आहे. विद्यार्थी कॉल्सची संख्या १० टक्के असून १६ ते २५ वयोगटातील २९ टक्के युवक आपल्या शंकांचे निरसन करून घेत आहेत. पुणे जिल्ह्य़ातून २५ टक्के दूरध्वनी आले आहेत. ०२०-२६३८३४५६ किंवा ९०९६४२६२४१ या क्रमांकावर संपर्क साधून कोणीही यासंदर्भात आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी मार्गदर्शन घेऊ शकतात. या कार्याचा विस्तार करण्यासाठी मुक्ता फाउंडेशनतर्फे सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, बचत गट आणि क्रीडा मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३१८२३४ किंवा ९०२८९२६७६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.