कचरावेचक महिलांचा सत्कार.. विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान.. भिडे वाडय़ातील पहिल्या शाळेच्या पायरीचे पूजन.. महिला छायाचित्रकार आणि गिर्यारोहण क्षेत्रातील महिलांचा गौरव.. २५ वर्षांहून अधिक काळ वकिली करणाऱ्या महिला वकिलांचा सत्कार.. श्रमशक्तीची सौंदर्यपूजा.. ‘बाई’ विषयावरील कविसंमेलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नारीशक्तीचा सन्मान करीत शहरात महिला दिन गुरुवारी उत्साहात साजरा झाला.

क्लीन गार्बेज मॅनेजमेंट आणि नागरिकांच्या पर्यावरण समितीतर्फे कचरा व्यवस्थापनातील महिलांचा साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. क्लीन गार्बेज मॅनेजमेंटचे मुख्य संचालक  विलास पोकळे, ललित राठी,  विवेक खोब्रागडे या वेळी उपस्थित होते. सरस्वती मंदिर स्किल डेव्हलपमेंट सेंटरतर्फे महापालिका सफाई कामगार, घरगुती धुणी-भांडी करणाऱ्या, कचरावेचक आणि रस्त्यावर भाजी विकणाऱ्या १२२ महिलांना फेशियल ट्रिटमेंट देऊन श्रमशक्तीची सौंदर्यपूजा करण्यात आली. मिसेस युनिव्हर्सल स्पर्धेतील विजेत्या पल्लवी कौशिक, उषा वाजपेयी, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, चित्रा जगताप आणि अश्विनी पांडे या वेळी उपस्थित होत्या. पुणे बार असोसिएशनतर्फे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचा जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. शैला कुंचूर यांचे तिहेरी तलाक विधेयक या विषयावर व्याख्यान झाले. बारचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, अ‍ॅड. लक्ष्मण घुले, अ‍ॅड. रेखा करंडे, अ‍ॅड. लक्ष्मी माने या वेळी उपस्थित होत्या. पुरुष गिर्यारोहकांच्या खांद्याला खांदा लावून गिर्यारोहण करणाऱ्या महिलांचा गिरिप्रेमी संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. ९४ वर्षांच्या लीला पाटील, समुपदेशक डॉ. स्नेहल आपटे, संस्थेच्या संस्थापिका उष:प्रभा पागे, उमेश झिरपे, गणेश मोरे या वेळी उपस्थित होते. दी मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँके तर्फे  अ‍ॅड. श्वेता जोशी, स्मिता इधाते, मुग्धा जेरे, ज्योती सारडा, तस्लीम बजाजवाला, डॉ. शायबाज दारुवाला अशा विविध क्षेत्रातील महिलांचा महाराष्ट्र कॉसमॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. मुमताज सय्यद, डॉ. हरुन सय्यद,तब्बसूम इनामदार, नसीम इनामदार, रुबीना शेख या वेळी उपस्थित होत्या.

भूमाता महिला संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केलेल्या भिडे वाडय़ाच्या पहिल्या पायरीचे पूजन करण्यात आले. भारतीय महिलांचे प्रेरणास्थान असलेल्या भिडे वाडय़ाचे ‘स्त्री शक्तीपीठ’ म्हणून राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे अशी मागणी संघटनेतर्फे या वेळी करण्यात आली. कोकणस्थ परिवारातर्फे  ज्येष्ठ छायाचित्रकार छाया चांगण यांचा सोनिया नेवरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आईकडून मला छायाचित्रणाचे बाळकडू मिळाले आणि त्याचे प्रतीक म्हणून माझे नाव छाया ठेवले असल्याचे चांगण यांनी सांगितले. प्रजासत्ताक भारत पक्षातर्फे ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना प्रवचनकार चंद्रकांत वांजळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘बाईच्या कविता’ या कार्यक्रमात संदीप खरे, अशोक कोतवाल, बालिका बिटले, संध्या रंगारी आणि डॉ. अश्विनी धोंगडे यांनी कविता सादर केल्या. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.