लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने शहर आणि परिसरातील २७ दस्त नोंदणी कार्यालयांची संपूर्ण जबाबदारी शुक्रवारी महिलांनी समर्थपणे सांभाळली. दस्त नोंदणीसारखे आव्हानात्मक काम लिलया पूर्ण करत महिला अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभरात १२७० दस्तांची नोंदणी केली. विशेष म्हणजे सात महिलांनी प्रथमच या पदाचे कार्यभार स्वीकारतानाच काही महिला अधिकारी बाळाच्या संगोपनाच्या रजेवर असतानाही कर्तव्यावर हजर झाल्या.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी शहरातील २७ दस्त नोंदणी कार्यालयांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानिमित्ताने शहरातील सर्व हवेली क्रमांक एक ते २७ कार्यालयांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. यापैकी दहा कार्यालयांकडील पदभार महिला अधिकाऱ्यांकडेच असल्याने उर्वरित १७ कार्यालयांचे पदभार या उपक्रमाच्या निमित्ताने महिलांकडे देण्यात आले. शहरातील सर्व कार्यालयांची दररोजची सरासरी दस्त संख्या १ हजार ३०० एवढी असते. या उपक्रमाच्या निमित्ताने महिलांनीही गतीने काम करत दिवसभरात १ हजार २३० दस्तांची नोंदणी करत महिलांची कार्यक्षमता दाखवून दिली. त्यांच्या या कामाचे कौतुक वकील, बांधकाम व्यावसायिक आणि पक्षकारांकडून करण्यात आले.
सात महिलांनी प्रथमच या पदाचा स्वीकारेलला कार्यभार, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. प्रियंका मसलखांब या अधिकारी त्यांच्या लहान बाळाच्या संगोपनाच्या रजेवर असतानाही त्या उपक्रमाच्या निमित्ताने कर्तव्यावर हजर झाल्या आणि हवेली क्रमांक १२ च्या कार्यालयाचा कार्यभार चिमुकल्या बाळाला कुशीमध्ये घेऊन सांभाळला. शारदा देशमुख आणि संगीता नीलपत्रेवार या गरोदर कर्मचाऱ्यांनी हवेली क्रमांक १८ आणि अन्य एक कार्यालयाचे कामकाज पाहिले. सुप्रिया कुंभार यांनी हवेली क्रमांक २१ कार्यालयाचा कार्यभार दुपारपर्यंत तर, नंतर हवेली क्रमांक २२ या कार्यालयाचा कार्यभार संध्याकाळपर्यंत सांभाळला. सह जिल्हा निबंधक वर्ग १ पदाची जबाबदारी संगीता फाटारे, सह जिल्हा निबंधक वर्ग २ ची जबाबदारी राजश्री खटके यांनी पाहिली.
शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक तसेच महिला शिपाई आणि संगणक परिचालक यांचा त्या-त्या कार्यालयात जाऊन सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दुय्यम निबंधकांनी कार्यालयात येणाऱ्या महिला वकील आणि पक्षकारांना गुलाब पुष्प, तुळशीचे रोप देऊन सत्कार केल्याची माहिती सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.
या उपक्रमानिमित्त युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दुय्यम निबंधक आणि सह जिल्हा निबंधक महिला अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, नोंदणी उपमहानिरीक्षक दीपक सोनावणे, सह जिल्हा निबंधक प्रवीण देशपांडे आणि संतोष हिंगाणे यांच्या प्रोत्साहनातून हा उपक्रम राबविण्यात आला.