‘मी शासनाच्या सेवेत असताना ऑफिस, घर सांभाळून लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे कठीण होते. मात्र त्यावेळी कार्यक्रमाना जाणं टाळलं, स्मार्ट फोन वापरणं बंद केलं. योग्य नियोजन केल्यानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मला यश मिळाला,’ असं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात सोळावा क्रमांक आलेल्या तृप्ती धोडमिसे नवत्रे यांनी सांगितलं.

जागतिक महिला दिनानिमित्तानं तृप्ती धोडमिसे नवत्रे यांच्याशी ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या प्रतिनिधीनं संवाद साधला. यावेळी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, ‘मी शासनाच्या सेवेत येण्यापूर्वी एका कंपनीत काम केलं. पण तेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयार करावी. परीक्षा देणे काही कठीण काम नव्हते. सुरुवातीला खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र अखेर राज्य शासनाच्या सेवेत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर देखील माझ मन स्वस्थ बसू देत नव्हत. मग आता लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ या! पण ही परीक्षा कठीण होती. कारण ऑफिस आणि संसार अशी दुहेरी जबाबदारी मी पार पाडत होते. मात्र त्या दरम्यान मी परीक्षेच नियोजन केले. ते म्हणजे सुरुवातीला सकाळी दोन तास आणि कामावरून आल्यावर तीन तास अभ्यास करायचे. असं करीत राहिले. पण नंतर वर्षभर समारंभांना जाणं टाळलं, त्यात विशेष आताच सोशल माध्यमाचं युग असल्याने ते प्रथम वापरणे बंद करून टाकले आणि साधा फोन वापरण्यास सुरुवात केली. यामुळे एक मनावर दडपणं आल होत की, आपण सर्वांशी संपर्क बंद करतोय, या गोष्टीचा वेगळा ताण होता. मात्र समोर एक लक्ष असल्याने, त्यासाठी मोठा त्याग करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टीमुळे परीक्षेत मला यश संपादन करणे शक्य झाले,’ असं तृप्ती म्हणाल्या.

‘आता परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करावे. तसेच परीक्षेच्या किमान महिनाभर आजारी पडणार नाही. याची विशेष काळजी, कारण याचा परिणाम परीक्षेवर होतो. आजवरच्या माझ्या यशात आई बाबा आणि पतीचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी मला वेळोवेळी सहकार्य केले नसते, तर या पदावर पोहोचू शकले नसते. त्यामुळे समाजातील प्रत्त्येक महिलेस कुटुंबातील विशेष साथ देण्याची गरज आहे,’ असं त्या म्हणाल्या.

‘पुरुषांप्रमाणे महिलांना देखील सुलभ आणि सुरक्षित जगता यावं’

‘समाजाकडून महिलांना फार अपेक्षा नाही. जितकं पुरुषांना सुलभ, सुरक्षित आणि मनमोकळं आयुष्य जगता येत. तितकंच आम्हाला देखील आयुष्य जगण्यास मिळावं. महिलांच्या दृष्टीने जेवढ्या वेगाने योजना आणि कायदे आणले जात आहेत. त्याच वेगाने समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येकजण आपण एकच आहोत. आज समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला काम करताना दिसत आहे. मात्र ज्यावेळी एकत्र काम करण्याची वेळ येते, तेव्हा महिला आणि पुरुष असे पाहता कामा नये. ते दोघेही एकच असल्याची भावना समाजात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे,’ असं मत तृप्ती धोडमिसे नवत्रे यांनी व्यक्त केलं.