लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेशोत्सवात शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला असताना खडकी भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेल्याच्या घटना उघडकीस आल्या.

कर्वेनगर भागातील भाजी मंडई चौकाजवळ एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भाजी मंडई परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

आणखी वाचा-पुणे : लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक

खडकी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रविवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडकी परिसरातून निघाल्या होत्या. महिलेच्या कडेवर मुलगी होती. दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी चोरून नेली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

गणेशोत्सवात शहर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साडेपाच हजार पोलीस बंदोबस्तावर असून, गुन्हे शाखेच्य पथकाने पायी गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात बंदोबस्त तैनात असताना दागिने चोरीच्या घटना घडल्या.