scorecardresearch

जी-२० परिषदेसाठीची कामे रखडली, आयुक्तांचा कारवाईचा इशारा; समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशानसाची युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कामे रखडल्याने कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे.

जी-२० परिषदेसाठीची कामे रखडली, आयुक्तांचा कारवाईचा इशारा; समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
Photo source: PTI

पुणे : जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशानसाची युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कामे रखडल्याने कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे. दरम्यान, कामांना गती देण्यासाठी आणि विविध कामांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

जी-२० परिषदेच्या निमित्ताने येत्या काही दिवसांत पुण्यात तीन बैठका होणार आहेत. या बैठकांच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्ती, चौकांचे आणि पुलांचे सुशोभीकरण, अशी विविध कामे सध्या वेगाने सुरू आहेत. लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, पदपथांची दुरुस्ती, चौक आणि वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, पथदिव्यांची दुरुस्ती, भिंतींची रंगरंगोटी अशी कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. त्यावेळी समन्वयाअभावी कामांना विलंब होत असल्याची बाब महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे आता शंभर ते दीडशे मीटर अंतरासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे. तशी सूचना संबंधित सर्व विभागांच्या खाते प्रमुखांना करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या एका पथकाने संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. त्यातही अनेक त्रुटी आढळून आल्याने ही कामे वेगात करा, असे आदेश दिले होते. तरीही महापालिकेच्या यंत्रणांकडून संथ गतीने कामे सुरू आहेत, त्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्युत विभाग, पथ विभाग, घनकचरा विभाग, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने संथ गतीने काम सुरू आहे. छोटी कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे ही कामे लवकर संपण्याची शक्यता नाही, हे लक्षात आल्याने आता १२ विभागप्रमुखांमध्ये या ११ किलोमीटरच्या रस्त्याची विभागणी करून १० जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत लेखी आदेश काढले आहेत, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, महामेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबरही बैठक घेण्यात आली. मेट्रो मार्गावरील रस्ते दुरुस्ती, दुभाजक दुरुस्ती, रंगकाम, लोखंडी अडथळ्यांवर लोगो लावण्यासंदर्भातील कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली. महामेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला काही अडचणींमुळे कामे पूर्ण करण्यास अडथळे येत असल्यास महापालिकेकडून कामे पूर्ण केली जातील, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 12:03 IST

संबंधित बातम्या