पुणे : वैद्यकीय पदव्युत्तर पदवीचे प्रवेश लांबल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याची मागणी मार्ड (महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) या संघटनेकडून करण्यात आली आहे.

२०२१ च्या नीट प्रवेश परीक्षेतून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांचे समुपदेशन रखडल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेत हे समुपदेशन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ते समुपदेश पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रियेला गती मिळणे शक्य नाही. मार्ड संघटनेचे राज्यभरातील डॉक्टर करोना महामारी काळातील कामामुळे दीर्घकाळापासून अतिरिक्त ताणाचा सामना करत आहेत. हा ताण कमी करण्यासाठी तातडीने वैद्यकीय पदव्युत्तर पदवीचे प्रवेश पूर्ण करण्याची मागणी मार्ड संघटनेकडून करण्यात आली आहे.

सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील म्हणाले, नीट परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन सातत्याने पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांवरील ताण वाढला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय सेवेची जबाबदारी निवासी डॉक्टरांच्या तीन तुकड्यांवर विभागलेली असते. सध्या केवळ दोन तुकड्यांमध्ये ती विभागली गेली आहे. महासाथीच्या काळातही निवासी डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात रुग्णसेवेचा ताण वाटून घेतला होता. आता आमची सहनशक्ती संपली आहे. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींची तातडीने पूर्तता करून पदव्युत्तर प्रवेश पूर्ण करण्यात यावेत अशी विनंती आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना करत आहोत. त्याबाबतचे पत्र भारत सरकार, नॅशनल मेडिकल काऊन्सिल आणि आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रालयाला देण्यात आल्याचे डॉ. ढोबळे पाटील यांनी सांगितले.