पिंपरी : मालकाने विश्वासाने दिलेले सोने वितळवण्याच्या बहाण्याने एका कामगाराने २२ लाख ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केला. ही घटना २ एप्रिल २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिंचवडगाव येथील एका सराफी फेढीत घडली.
याबाबत देवेश कैलाश वर्मा ( वय २७, रा.वाकड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीमंता संतोष समांता (वय ४३, चिंचवडगाव; मूळ रा. पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे दागिने बनवण्याचे काम आरोपीकडे विश्वासाने सोपवत असत. आरोपीने फिर्यादीने दिलेले सोने वितळवण्यासाठी घेतले आणि त्यातील २४५ ग्रॅम सोने स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतले. अशा प्रकारे २२ लाख ५ हजार रुपयांच्या सोन्याची चोरी करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
बांधकाम साईटवरून पडल्याने मजुराचा मृत्यू
रावेत येथील एका बांधकाम साईटवर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला असून, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रावेत येथे घडली.
याबाबत कामगार महिलेनेरावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती चंद्रकांत तेजु जाधव हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वीट बांधकामाचे काम करत असताना तोल गेल्याने खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी जाळी, हेल्मेट किंवा इतर कोणतीही साधने उपलब्ध करून दिली नव्हती. तसेच सुरक्षेबाबत कोणतीही सूचना दिली नसल्याने या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.
निगडीत गांजा बाळगणाऱ्या मजुराला अटक
निगडी परिसरात बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका मजुराला रंगेहात पकडून अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (१४ फेब्रुवारी) रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई विकास जनार्दन रेड्डी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील संपत म्हस्के (४४, बालाजीनगर, भोसरी; मूळ रा. केसापुरी कॅम्प, माजलगाव, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट नगरमधील बीएजी बिल्डिंग जवळ एका शेडच्या बाजूला आरोपी संशयास्पद रित्या थांबला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ हजार ६०० रुपये किमतीचा २३२ ग्रॅम गांजा मिळून आला. अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई
मोकळ्या जागेत तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना नोटीस दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळत होते. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि २ हजार २८० रुपये रोख जप्त केले आहेत. निगडी पोलीस तपास करत आहेत.

