पिंपरी: पाण्याची टाकी दुरूस्त करताना उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मावळातील उर्से येथे घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुखदेव हरी राय (वय-४०, रा. उर्से, ता. मावळ) असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुखदेव यांच्या पत्नीने शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से गावच्या हद्दीत वारीवाना कन्ट्रक्शन यांच्या मालकीच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. यावेळी उंचावरून पडल्याने सुखदेव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस बांधकाम ठेकेदार मनोज वर्मा (रा. बावधान) हे जबाबदार असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे.

हे ही वाचा : पुण्यात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू, संगणक अभियंता महिलेवर गुन्हा

बांधकामाच्या शेजारी खड्डा खोदण्यात आला होता. त्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना नव्हत्या. सुखदेव यांना काम करताना हेल्मेट तथा इतर संरक्षक उपकरणे देण्यात आली नव्हती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार, पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.