पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या दर्शनासाठी मंगळवारी सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात आणण्यात आला होता. अस्थिकलशाचे दर्शन घेताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी खराळवाडी येथील पक्षाच्या कार्यालयातून अस्थिकलश पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आणला. माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, सीमा सावळे, अतुल शितोळे, सारंग कामतेकर, कार्याध्यक्ष फजल शेख या वेळी उपस्थित होते.
स्मारकाच्या समोरील प्रांगणात फुलांनी सजविलेल्या मंचावर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. सकाळपासून नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. अस्थिकलशाचे दर्शन घेताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. दुपारी तीननंतर पवना नदीत मोरया गोसावी घाटावर अस्थिविसर्जन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आज निवडणार?
महापालिकेतील गटनेता निवडण्यासाठी अजित पवार यांचे स्वीय सहायक विकास पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची मंगळवारी बैठक झाली हाेती. यामध्ये तीन ते चार नावांवर चर्चा झाली हाेती. गटनेता निवडण्याचे सर्व अधिकारी अजित पवार यांना देण्याचा ठराव झाला हाेता. पाटील यांच्यामार्फत नावे अजित पवार यांच्याकडे दिली जाणार हाेती. परंतु, बुधवारीच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना विचारून राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गटनेता निश्चित केला जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गटाची आज नोंदणी केली जाणार आहे. त्यावेळी गटनेता निवडला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एक आमदार, ३७ नगरसेवक
महापालिकेत सत्ता नसली तरी शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ३७ नगरसेवक निवडून आले. ७६ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे शहरात संघटना मजबुत आहे. पिंपरीचा आमदार पक्षाचा आहे. तीन नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक हाेणार आहेत.

