जागतिक मधमाशी दिन काल साजरा झाला. यानिमित्ताने पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त सहायक संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धनंजय वाखले यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
मधमाश्यांचे महत्त्व आपल्याला पटले आहे का?
- मधमाशीचे महत्त्व जगातील बहुतेक सर्व विकसित देशांतील बहुसंख्य लोकांना नुसते पटलेलेच नाही, तर ते तसे आचरणातही आणताना दिसतात. त्या मानाने आपल्या देशात या विषयी जनजागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. नद्या व पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यासमोर जशा दूषित जल, वायू आदी समस्या उभ्या ठाकल्या आहेत, तसेच मधमाश्यांचे संवर्धन, संरक्षण आणि संगोपन केले नाही, तर अन्नटंचाई व अन्नसुरक्षेच्या तीव्र अडचणींना सामोरे जावे लागेल.
छोट्याशा मधमाशीमुळे अन्नटंचाई कशी होऊ शकते?
- मधमाश्या पृथ्वीतलावरून नष्ट झाल्या, तर कुठल्याही वनस्पतीला फुले, फळे व बी येणार नाहीत. मधमाश्यांमुळे होणारे परागीभवन थांबेल. पर्यायाने अन्न उत्पादन होणार नाही. त्यामुळे संपूर्ण मानव जातच काय, पण कुठलेही जीव, जंतू, कीटक, पक्षी, प्राणी आदी जिवंत राहू शकणार नाहीत. मधमाश्या आणि वनस्पती पूर्णपणे एकमेकांवर अवलंबून आहेत. मधमाश्या उपजीविकेसाठी फुलांपासून मकरंद व पराग त्यांचे अन्न म्हणून एकत्रित करतात. या प्रक्रियेदरम्यान फुलांतील परागकणांचे निर्वहन होते आणि आवश्यक परागीभवन घडून येते. यामुळे फलधारणा व बीजधारणा होते. म्हणूनच पीक परिसंस्थेचे कार्य राखण्यासाठी मधमाश्या महत्त्वपूर्ण आहेत. मधमाश्यांपासून बहुगुणी आणि पौष्टिक मध, पराग, रॉयल जेली आणि मेण, प्रोपोलिस आणि मधमाश्यांचे विष असे इतर बहुमूल्य पदार्थही तयार होतात.
मधमाश्या आणि अधिक पीक उत्पादन यांचा संबंध कसा आहे?
- निसर्गात परागीभवन घडण्यासाठी वारा, पाणी, पक्षी-प्राण्यांची विष्ठा आणि मनुष्य स्वत:ही माध्यम आहे. या सर्वांत प्रमुख आणि बहुमूल्य, संघटित आणि शिस्तीत योगदान मधमाश्यांच्या परागीभवनाने होते. जगातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक वनस्पतींचे परागीभवन मधमाश्यांद्वारे घडते. त्यामुळेच जगाच्या पोषणाकरिता जवळजवळ ९० टक्के अन्नपदार्थ मधमाश्या पुरवतात. यात बहुतांश कडधान्य, भाजीपाला, फळभाज्या, फळे, मसाल्याचे पदार्थ, सुकामेवा, नारळ, सुपारी, कॉफी, चहा, तेलबिया आणि डाळी यांचा समावेश आहे.
मध गोळा करण्याची पारंपरिक पद्धत कोणती आहे?
- अनेकदा झाडावरून, कपाऱ्यांतून मधमाश्यांना हुसकावून, त्यांना इजा पोहोचवून किंवा जाळून वा मारून मधाची पोळी हस्तगत केली जातात. अशा प्रकारे काढलेला मध अतिशय अशुद्ध व दूषित असतो. त्यामुळे मधमाश्या व त्यांची भावी पिढी नष्ट पावते. या पद्धतीतून निसर्गाचे मोठे नुकसान होते. हे थांबविले पाहिजे आणि मधमाश्यांचे संरक्षण, संवर्धन करून शास्त्रोक्त पद्धतीनेच मध उत्पादन केले पाहिजे. पृथ्वीवर मधमाश्यांच्या वीस हजारांहून अधिक विविध प्रजाती आहेत. त्यांची प्रत्येकाची मोहोळ बनविण्याची वेगवेगळी पद्धत असते. तसेच, त्या पद्धतींमुळे मध साठविण्याची क्षमताही बदलत जाते. आग्या मधमाश्यांच्या वसाहती पाळता येत नाहीत. मधमाश्यांची एक जात म्हणजे स्टिंगलेस बी. या मधमाशीचे महत्त्व जाणून आता त्यांच्या वसाहतीदेखील विशिष्ट पेटीत ठेवून पाळायला सुरुवात झाली आहे. सातेरी ही अशीच एक जात. या मधमाश्यांचे पालन आता महाराष्ट्र, तसेच दक्षिण व पूर्व भारतातच जास्त होते. कारण, इतर राज्यांत युरोपीय मधमाश्यांचा प्रसार जास्त झाला आहे.
पोळ्यांमधून मध काढण्याची योग्य पद्धत कोणती ?
- आग्या माश्यांच्या मोहोळावरून मधमाश्यांना दूर करून त्या पोळ्यांमधून वरच्या बाजूला फक्त मधाचा भाग अलगद कापून मध काढतात. त्यामुळे मधमाश्यांना इजा पोहोचत नाही. शिवाय मधपण स्वच्छ व शुद्ध मिळतो. नंतर मधमाश्या त्या कापलेल्या पोळ्याचा भाग पुन्हा नव्याने बांधून त्यात मध साठवतात. हे तंत्र शास्त्रीय पद्धतीने व प्रशिक्षणाने सहज अवगत करता येते. तसेच सातेरी जातीत किंवा युरोपीयन मधमाशीपालनात शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करतात. प्रशिक्षण व मार्गदर्शनाद्वारे शुद्ध आणि उत्तम प्रतीचा मध मोठ्या प्रमाणात उत्पादित करतात. तसे केले, तरच मध शुद्ध राहतो आणि त्याचे अपेक्षित पौष्टिक आणि औषधी गुणधर्म टिकून राहतात.
shriram.oak@expressindia.com
