येत्या रविवारी (१४ जून) ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने पावणेचारशेपेक्षाही अधिक वेळा प्लेटलेटदान करणारे संजय बापट यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला हा संवाद.

१. रक्तदान, प्लेटलेटदानाची गरज का आहे?

  • अपघातामुळे होणारा रक्तस्राव, हृदयशस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपणासारख्या मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव किंवा थॅलेसेमियासारख्या आजारांसाठी पूर्ण रक्ताची (होल ब्लड) गरज असते. तर, डेंग्यू, कर्करोग, केमोथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. शरीरातील रक्तस्राव थांबविण्यासाठी प्लेटलेट्स अत्यंत आवश्यक असतात. तेथे प्लेटलेटदान (एसडीपी) केल्यास त्याचा फायदा गरजू रुग्णांना होऊ शकतो. प्लेटलेट संख्या २० हजारांपेक्षा कमी झाली, तर शरीरात आपोआप रक्तस्राव सुरू होऊ शकतो. अशा वेळी बाहेरील प्लेटलेट्स शरीरात चढवणे हाच एकमेव तांत्रिक उपाय उरतो.

२. प्लेटलेटदान म्हणजे काय? ते कसे करतात?

  • जेव्हा आपण फक्त प्लेटलेटदान करतो, तेव्हा त्याला तांत्रिक भाषेत ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ म्हणतात. यामध्ये दात्याच्या हाताला एक यंत्र जोडले जाते. हे यंत्र (ब्लड सेंट्रिज्युज मशिन) दात्याचे रक्त काढून घेते आणि ते वेगाने घुसळते. वेगाने घुसळल्यामुळे रक्तातील घटक त्यांच्या वजनानुसार वेगळे होतात. यंत्र फक्त प्लेटलेट्स आणि थोडा प्लाझ्मा काढून घेते आणि बाकीचे रक्त (तांबड्या व पांढऱ्या पेशी) पुन्हा दात्याच्या शरीरात सोडून देते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपले शरीर अवघ्या ४८ ते ७२ तासांत या प्लेटलेट्स पुन्हा तयार करते. म्हणजेच, आपण दर १५ दिवसांनी प्लेटलेटदान करू शकतो.

३. प्लेटलेटदानाला सुरुवात कधी केलीत?

  • मी जैववैद्यकीय अभियंता आहे. १९८६ पासून मी फक्त रक्तदान करायचो, पण १९९४ पासून मी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल (कॅन्सर हॉस्पिटल) येथे प्लेटलेटदान करायला सुरुवात केली. सध्या मी कधी ‘टाटा’मध्ये, तर कधी पुण्यातील जनकल्याण पेढीमध्ये प्लेटलेटदान करतो. मी जेव्हा प्लेटलेटदान करायचो, त्या वेळी दोन्ही हातांत सुया लावून ती प्रक्रिया व्हायची आणि साधारण दोन ते अडीच तास लागायचे. आता प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. मी गेली ३२ वर्षे सातत्याने महिन्यातून एकदा प्लेटलेटदान करतो.

४. प्लेटलेटदानाचा काही फायदा आहे का?

  • तुम्ही प्लेटलेटदान करता, तेव्हा अस्थिमज्जेला (बेन मॅरो) नवीन आणि ताज्या प्लेटलेट्स तयार करण्यासाठी चालना मिळते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया ताजी राहते. हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. नियमित रक्तदान किंवा प्लेटलेटदान केल्याने रक्ताची घनता (व्हिस्कॉसिटी) संतुलित राहते. यामुळे रक्तवाहिन्यांवर येणारा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते, असे काही अभ्यासांतून दिसून आले आहे. यातून कोणताही तोटा होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

५. प्लेटलेटदान कोण करू शकतो ?

  • ज्यांचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान आहे, वजन किमान ६० किलो आहे, प्लेटलेट काउंट किमान दीड लाख ते साडेचार लाख प्रति मायक्रोलिटर आहे, हिमोग्लोबिनचे प्रमाण किमान १२.५ जी/डीएल किंवा त्याहून अधिक आहे, ज्या व्यक्तीला कोणताही गंभीर आजार नाही, तसेच, गेल्या काही दिवसांत डेंग्यू किंवा मलेरिया झालेला नाही, असा कोणीही प्लेटलेट देऊ शकतो. अर्थात, एकदा डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

६. या दानांसाठी समाजाने पुढे येणे का गरजेचे आहे?

  • प्लेटलेटदानामुळे तुम्ही केलेले दान पुढच्या पाच दिवसांत कोणाचे तरी भाऊ, बहीण किंवा कोणाचे तरी हसतेखेळते बाळ वाचवणार आहे. त्यामुळे भीती सोडून, रक्तदान किंवा प्लेटलेटदान केल्यामुळे अशक्तपणा येईल, हे गैरसमज दूर करून प्लेटलेटदान करणे आवश्यक आहे. आपण दान न केलेल्या प्लेटलेट्ससुद्धा ८ ते १० दिवसांत आपोआप नष्ट होतात आणि शरीर नवीन तयार करते. त्या शरीरातच नष्ट होण्यापेक्षा, कोणाच्या तरी नसांमध्ये वाहून त्याचा जीव वाचवत असतील, तर त्यापेक्षा मोठे पुण्य कोणते?
    shriram.oak@expressindia.com