पुणेः आठ जून हा जागतिक ‘ब्रेन ट्यूमर’ दिन म्हणून ओळखला जातो. ‘ब्रेन ट्यूमर’ हा शब्द उच्चारला, की धडकी भरते. एक प्रकारचा कर्करोगच असल्याचा सर्रास समज असून, यातून वाचणे शक्य नसल्याची भीती खोलवर रुजलेली आहे. मात्र, बदलते तंत्रज्ञान, निदानाच्या आधुनिक पद्धती आणि वाढलेली जागरुकता यामुळे गेल्या काही काळात हे चित्र झपाट्याने बदलत असून, ‘ब्रेन ट्यूमर’च्या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले.
वैद्यकीय तज्ञांच्या मते, अनैसर्गिकरित्या मेंदूमध्ये तयार होणाऱ्या पेशींच्या गाठी म्हणजे ब्रेन ट्यूमर. या पेशी अनियंत्रितरीत्या झपाट्याने वाढतात. एक मिलीमीटरमध्ये तब्बल पाच कोटी पेशी आढळतात. यामुळे मेंदूत सूज येणे कवटीमध्ये पाणी साठणे या काही गोष्टींमुळे लक्षणे जाणवायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा ब्रेन ट्यूमर हा प्राथमिक टप्प्यात न समजण्याची अनेक कारणे तज्ज्ञ सांगतात. यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे या आजारात आढळणारी लक्षणे ही सर्वसामान्य असतात.
‘ब्रेन ट्यूमर’ची लक्षणे
या आजारात तीव्र डोकेदुखी ही सलग दोन-तीन आठवडे राहिल्यास तज्ज्ञ तपासण्या करण्याचा सल्ला देतात. याशिवाय, अंधुक दिसणे, फिट्स येणे, उलट्या होणे, मळमळ होणे, अशक्तपणा जाणवणे, तोल जाणे, बोलण्यात गोंधळ होणे, चक्कर येणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळी खंडित होणे ही प्रामुख्याने लक्षणे आढळतात.
जागतिक सर्वेक्षण काय सांगते?
अमेरिकेत जैवतंत्रज्ञान आणि जैववैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ या संस्थेच्या माहितीनुसार भारतात दर वर्षी ३० ते ४० हजार ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांचे निदान होत आहे. अर्थात भारतात मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित ट्यूमरचे प्रमाण दर एक लाख लोकांमागे ५ ते १० इतके असून त्यात वाढ होत आहे. सर्व कर्करोगांपैकी सुमारे २ टक्के रुग्णांना हा आजार होतो. अभ्यासांनुसार अॅस्ट्रोसाइटोमा हा मेंदूचा सर्वाधिक आढळणारा ट्यूमर आहे. भारतात काही प्रकारचे मेंदूचे ट्यूमर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत कमी वयात आढळतात. मुलांमध्येही अॅस्ट्रोसाइटोमा आणि मेडुलोब्लास्टोमा हे ट्यूमर अधिक प्रमाणात दिसून येतात. हे ट्यूमर सौम्य आणि घातकही असू शकतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा
‘जॉन हॉपकिन्स अँड मेडिसीन’ हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध न्यूरोलॉजी आणि अंकोलॉजी केंद्र आहे. यांनी गेल्या १५ वर्षांतील या क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा धांडोळा घेतला. किमोथेरपी, रेडिएशन आणि शल्यचिकित्सा या मूलभूत उपचारपद्धतींमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले असून, सध्या जगभरात इम्युनो उपचारपद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्याचप्रमाणे प्रोटॉन उपचारपद्धती भारतात असून, मुंबई आणि चेन्नईमध्येही उपलब्ध आहे. मात्र, या उपचारपद्धतीचा खर्च २५ ते ३० लाख रुपयांच्या घरात असून, अजूनही ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. शस्त्रक्रिया करत असताना न्यूरो नेव्हिगेशनद्वारे गाठींचा आकार आणि स्थान याची तंतोतंत माहिती शल्यचकित्सकाला मिळते. यामुळे गाठ काढणे सोपे झाले आहे. याबरोबरच लेझर पद्धतीद्वारे गाठींचा अचूक वेध घेऊन त्या जाळल्या जातात. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.
रुग्णाला या आजाराचे निदान होते, तेव्हा त्याचे कुटुंबीय मानसिकरीत्या बरेच खचते. विविध उपचारपद्धती सुरू असताना रुग्णांच्या कुटुंबाचीही परवड होत असते. एक रुग्ण अतिदक्षता विभागातून सर्वसामान्य वॉर्डमध्ये येतो,त्यानंतर तो घरी जातो. तरीही, कुटुंबाचा त्रास संपलेला नसतो. कुटुंबामध्ये एक भीती, अस्वस्थता कायम असते. मात्र, ब्रेन ट्यूमरला अजिबात घाबरू नका. धीराने तोंड द्या. वेळ, संयम, पैसा, आणि सकारात्मकता यामुळे या आजारावर सहज मात करता येते.- डॉ सचिन गांधी,
न्यूरोसर्जन ब्रेन ट्यूमरसाठी तालुकास्तरावरही निदानाची सुविधा उपलब्ध असल्याने या आजाराविषयी जागरुकता वाढली आहे. मेंदूत येणारी प्रत्येक गाठ कॅन्सरच असते, असे नाही तर ४० ते ५० टक्के गाठी सर्वसामान्य शल्यचिकित्सेने काढणे शक्य आहे. तसेच, जर गाठींच्या कर्करोगाचे पहिल्याच टप्प्यात निदान झाले, तर आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्ण पूर्णपणे बरा होतो. ही या आजारातील सर्वांत जमेची बाजू आहे.- डॉ. दिलीप कियावत, ज्येष्ठ न्यूरोसर्जन
