पुणे : कर्णबधिरता ही केवळ उतारवयातील समस्या राहिलेली नसून, बदलती जीवनशैली, आवाजाच्या सततच्या संपर्कासह हेडफोनच्या वाढत्या वापरामुळे तरुणांमध्ये श्रवणदोषाचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना ऑनलाइन बैठका आणि कामाच्या स्वरूपामुळे दीर्घ काळ हेडफोनचा वापर करावा लागतो. त्यामुळे श्रवणक्षमता जपण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित तपासणीबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज कान-नाक-घसा तज्ज्ञांनी व्यक्त केली. सप्टेंबरचा चौथा रविवार जागतिक कर्णबधिरता दिवस म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर कर्णबधिरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नवजात बालकांत लवकर निदान महत्त्वाचे
जन्मजात श्रवणदोषाचे निदान जितक्या लवकर होईल, तितका मुलांच्या भाषा आणि बोलण्याच्या विकासासाठी फायदा होतो. मात्र, देशभरात नवजात बालकांची श्रवण तपासणी आणि त्यानंतरचे उपचार अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आवश्यक मनुष्यबळ, उपकरणांची उपलब्धता आणि पालकांमधील जागरूकतेचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मध्यम श्रवणदोषाकडे दुर्लक्ष
काही मुलांमध्ये तीव्र श्रवणदोष असल्याचे लवकर लक्षात येते. मात्र, मध्यम स्वरूपाचा श्रवणदोष असलेल्या मुलांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मूल टाळी वाजवल्यावर किंवा जवळून बोलल्यावर प्रतिसाद देत असल्याने पालकांना श्रवणदोष असल्याचा संशय येत नाही. परिणामी, निदानाला विलंब होतो. अनेकदा मूल पाच-सहा वर्षांचे झाल्यावर शाळेत जाण्याच्या वयात भाषा विकसित झालेली नसल्याचे लक्षात येते.
हेडफोनचा वापर घातक
पूर्वी वयोमानानुसार श्रवणक्षमता कमी होणे किंवा यंत्रसामग्रीच्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये श्रवणदोष आढळत असे. आता मात्र दीर्घ काळ हेडफोन वापरणाऱ्या आयटी व ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांमध्ये, महाविद्यालयीन तरुणांमध्ये अशा समस्या दिसत आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे
श्रवण मज्जातंतूला झालेली हानी अनेकदा पूर्ववत करता येत नाही. त्यामुळे श्रवणक्षमता कमी झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधीपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. हेडफोनचा वापर आवश्यक असल्यास आवाजाची पातळी आणि वापराचा कालावधी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे; तसेच कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांच्या श्रवण आरोग्याबाबत जागरूकता आणि नियमित तपासणीचे उपक्रम राबवण्याची गरज कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. दिव्या सावंत यांनी व्यक्त केली.
लक्षणे ओळखा
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास तपासणी करा…
- आवाज दिल्यावर प्रतिसाद न देणे.
- जवळून बोलल्यावर प्रतिसाद देणे. मात्र, दुरून बोलल्यावर प्रतिसाद न देणे.
- वयानुसार बोलण्याचा आणि भाषेचा विकास न होणे.
- टीव्ही किंवा मोबाइलचा आवाज मोठा ठेवणे.
- शाळेत शिक्षकांच्या सूचना समजण्यात अडचण येणे.
तज्ज्ञ म्हणतात…
श्रवणदोषाचे लहान वयात निदान होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. यावर मात करण्यासाठी सांकेतिक भाषा विकसित झाली आहे. यासाठी शालेय स्तरावर द्विभाषा पद्धत यायला हवी, असे श्रवणदोषतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी सांगितले. कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. दिव्या सावंत म्हणाल्या, ‘बदलत्या जीवनशैलीमुळे श्रवणदेष वाढत आहे. सतत हेडफोन लावल्यामुळे श्रवण क्षमता कमी होत चालली आहे. एकदा का ऐकू येणे कमी झाले, की पुन्हा श्रवणशक्ती कमावता येत नाही. यावर कुठलाही ठोस वैद्यकीय उपाय नाही. त्यामुळे वेळीच जीवनशैली बदलणे गरजेचे आहे.’
मोफत कॉक्लीअर इम्प्लान्ट
श्रवणदोष असल्यास लहान वयात निदान होणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दोन वर्षांच्या आतील बालकावर मोफत कॉक्लीअर इम्प्लान्ट केले जाते. मात्र, याविषयी पालकांमध्ये जागरुकता नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२४-२५ मध्ये ११ शस्त्रक्रिया झाल्या. गेल्या वर्षी १३ शस्त्रक्रिया पार पडल्या, तर या वर्षात नऊ महिन्यांत केवळ दोनच शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
