पुणे : जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day) दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मूत्रपिंडांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि मूत्रपिंड विकारांचे लवकर निदान व प्रतिबंध याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. नियमित तपासणी, योग्य आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली यामुळे मूत्रपिंडांचे आरोग्य दीर्घकाळ जपता येते.

या पार्श्वभूमीवर मणिपाल हॉस्पिटल बाणेरमधील मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. तरुण जेलोका त्यांनी मूत्रपिंडविकाराच्या सर्वांत गंभीर धोक्याकडे लक्ष वेधले आहे.

डॉ. तरुण जेलोका म्हणाले की, पॉलीसिस्टिक किडनी डिसीज हा असा आजार आहे की, जो अनेक वर्षे कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसता शरीरात वाढत राहू शकतो. अनेक वेळा रुग्णांना या आजाराची माहिती तेव्हाच होते, जेव्हा मूत्रपिंडांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या कमी झालेली असते. वैद्यकीय आकडेवारीनुसार, ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज हा आजार सुमारे १ हजार व्यक्तींपैकी एकात आढळतो. पालकांपैकी कोणाला हा आजार असेल, तर सुमारे ५० टक्के संततीमध्ये त्याचा धोका असतो. अद्याप या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र योग्य उपचार नियोजनामुळे या आजाराची तीव्रता कमी करता येते.

सुरुवात कशी होते?

या आजारामध्ये मूत्रपिंडांमध्ये अनेक सिस्ट म्हणजे द्रवयुक्त गाठी तयार होतात आणि त्या कालांतराने मोठ्या होत जातात. त्यातून मूत्रपिंडांचा आकार वाढत जातो. याचा परिणाम होऊन अखेर मूत्रपिंडांचे कार्य प्रभावित होते. काही रुग्णांमध्ये कंबरदुखी, लघवीत रक्त येणे, उच्च रक्तदाब किंवा वारंवार मूत्रमार्गाच्या संसर्गासारखी लक्षणे दिसू शकतात, परंतु अनेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

काळजी काय घ्यावी?

मूत्रपिंड निकामी होण्याच्या सुमारे ५ टक्के प्रकरणांमध्ये या आजाराचा वाटा असल्याचे दिसून येते. या आजारावर औषध उपलब्ध नसल्यामुळे वेळेवर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नियमित तपासणी, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि योग्य औषधोपचार यामुळे या आजाराची प्रगती मंदावता येऊ शकते. आजार प्रगत अवस्थेत गेला, तर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण हे उपचार पर्याय रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. विशेषतः कुटुंबामध्ये या आजाराचा इतिहास असल्यास नियमित वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत गरजेचे ठरते, असे डॉ. जेलोका यांनी स्पष्ट केले.