मुंबई : जगातील सर्वाधिक लांबीचा कॉमन इंडियन वुल्फ स्नेक म्हणजेच बिन विषारी कवड्या साप पुण्यानजीकच्या दापोडीत आढळून आला आहे. प्रामुख्याने आशिया खंडात आढळणाऱ्या या सापाची एकूण लांबी १०२१ मिमी (१.०२१ मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे. छायाचित्रांसह स्वतंत्र पडताळणी करून नोंदविलेला हा आतापर्यंतचा आजवरचा सर्वात लांब साप ठरला आहे. संबंधित अभ्यास हर्पेटोलॉजी नोट्स या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागातील पीएच.डी. संशोधक महेश बिलासकर यांनी १० मार्च २०२६ रोजी रात्री पुण्यातील दापोडी परिसरातील दाट लोकवस्तीमधून या सापाची सुरक्षित सुटका केली होती. त्यानंतर सापाची अचूक लांबी अनेक वेळा मोजण्यात आली. त्याच्या शारीरिक वैशिष्ट्यांची (स्केल काउंट) तपासणी करून त्याची ओळख निश्चित करण्यात आली. आवश्यक छायाचित्रण आणि वैज्ञानिक नोंदी पूर्ण झाल्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.

या पूर्वी कॉमन इंडियन वुल्फ स्नेकची (कवड्या) कमाल लांबी सुमारे ९५० मिमी इतकी नोंदविण्यात आली होती. मात्र, त्या नोंदींना पुरेशी छायाचित्रे किंवा इतर वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नव्हते. पुण्यातील या नमुन्याची नोंद मात्र छायाचित्रे, अचूक मोजमाप, स्केल काउंट तज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने, ती अधिक विश्वासार्ह मानली जात आहे.

कॉमन इंडियन वुल्फ स्नेक हा साप आग्नेय आशियातील काही देशांसह भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारच्या काही भागांत मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतभर आदीवास असणाऱ्या या बिन विषारी साप रात्री सक्रीय असतो. अनेकदा घरांच्या परिसरात किंवा मानवी वस्तीजवळ आढळतो. विषारी सापाशी साम्य असल्याने लोकांमध्ये त्याच्याबद्दल गैरसमज आहेत. प्रत्यक्षात हा साप मानवासाठी निरुपद्रवी असून, घरातील पाल आणि लहान सरपटणाऱ्या प्राण्यांवर उपजीविका करतो. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. या संशोधनामुळे भारतातील सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या सापांच्या जैविक माहितीमध्ये भर पडली असून, वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान केलेल्या शास्त्रीय नोंदींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मण्यार सारखा दिसणारा, पण, बिन विषारी

या सापाला मराठीत कवड्या किंवा कवडी साप म्हणतात. मण्यार सारखा दिसतो, त्यामुळे अनेकदा लोक याला अत्यंत विषारी समजून मारतात. कवड्या सापाचे डोके थोडे चपटे आणि चमच्या सारखे असते, जे त्याच्या मानेपेक्षा वेगळे आणि उठून दिसते. मण्यार सापाचे डोके गोल असते आणि ते मानेशी एकरूप झालेले असते. मण्यार सापाच्या पाठीच्या अगदी मधोमध षटकोनी आकाराच्या खवल्यांची एक मोठी ओळ असते. कवड्या सापाचे खवले सर्वत्र सारखे आणि गुळगुळीत असतात. कवड्या सापाचे पट्टे डोक्याजवळ जास्त ठळक असतात आणि शेपटीकडे फिकट होत जातात.

उत्तम कीटक नियंत्रकाची भूमिका

निसर्गातील उत्तम कीटक नियंत्रक असलेला साप रात्रीच्या वेळी अत्यंत सक्रिय असतो. मानवी वस्त्यांमध्ये जिथे उजेडामुळे पाली, सरडे, बेडूक किंवा लहान उंदीर जमा होतात, तिथे हा साप भक्ष्याच्या शोधात येतो. कवड्या सापाच्या जबड्यात लांब आणि मागच्या बाजूला वळलेले दात असतात. त्यामुळे ‘वुल्फ स्नेक म्हणजेच लांडगा साप म्हणतात. हे दात त्याला पालीसारखे गुळगुळीत भक्ष्य घट्ट पकडण्यास मदत करतात.