पुणे : बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि एकटेपणामुळे विस्मरणाच्या (डिमेन्शिया) विकारात वाढ होत असून, उतारवयातील विस्मरण टाळण्यासाठी वयाच्या चाळिशीपासूनच मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.

दर वर्षी १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक आजारांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांच्या अनुभवाचा उपयोग मानसिक रुग्णांसाठीच्या सेवा आणि धोरणबदलात व्हावा, अशी यंदाची संकल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर, विस्मरणासारखे आजार लक्षण पातळीवर ओळखून त्यावर काम करणाऱ्या काहींशी संपर्क साधला असता, त्यांनी या विकाराबाबतची सद्य:स्थिती कथन केली.

पुण्यात गेल्या १२ वर्षांपासून अनुराधा करकरे ‘रेनबो डे केअर सेंटर’ चालवतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिमेन्शिया प्राथमिक टप्प्यात असतो, असेही काही जण येथे येतात. ‘डिमेन्शिया हा एकच आजार नसून, विविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांचा समूह आहे. सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचारांबरोबरच मेंदूला सतत आव्हान देणाऱ्या उपक्रमांमुळे रुग्णांची कार्यक्षमता आणि जीवनाची गुणवत्ता काही काळ टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. ‘रेनबो डे केअर’मध्ये सध्या सुमारे ३५ ते ४० ज्येष्ठ नियमित येतात. त्यांपैकी १३ ते १४ जणांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील डिमेन्शियाची लक्षणे आहेत,’ असे करकरे यांनी सांगितले.

रेनबो केंद्रामध्ये शब्दखेळ, गणिती कोडी, चित्रकला, हस्तकला, संगीत, नाट्य, कथाकथन, श्लोक आणि पाठांतर अशा विविध उपक्रमांमधून ज्येष्ठांच्या मेंदूला चालना दिली जाते. हात, डोळे आणि मेंदू यांचा समन्वय साधणारे उपक्रमही आयोजिले जातात. त्यामुळे शब्दसंपत्ती वाढणे, नेमकेपणाने बोलता येणे आणि कुटुंबीयांशी संवाद सुधारण्यास मदत होत असल्याचे करकरे यांनी नमूद केले.

त्या म्हणाल्या, ‘ज्येष्ठांमधील एकटेपणा आणि नैराश्य हे प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत. जोडीदाराचे निधन, विभक्त कुटुंबपद्धती, परदेशात किंवा अन्य शहरांत राहणारी मुले यामुळे ज्येष्ठांना भावनिक आधाराची कमतरता भासते. त्यामुळे कुटुंबीयांनी ज्येष्ठांशी नियमित संवाद साधण्याबरोबरच त्यांना छोटी छोटी कामे देऊन सक्रिय ठेवण्याची गरज आहे. वयाच्या चाळिशीपासूनच मेंदूला सतत काम देणे, ताण कमी करणे, संवाद वाढवणे आणि सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे.’

पन्नाशीतच ‘डिमेन्शिया’

डिमेन्शिया हा आजार आता पन्नाशीच्या लोकांमध्येही पाहायला मिळत असल्याचे समुपदेशक योगिनी मांडके यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘हा विकार टाळण्यासाठी मेंदूला चालना देणे, बोटांचे व्यायाम करणे, कामे करणे आवश्यक आहे. यामुळे हा आजार प्राथमिक टप्प्यात काही काळ का होईना थोपवता येऊ शकतो. एकदा झाल्यावर मात्र हा आजार पूर्ण बरा होणारा नसून, तो वाढत जाणारा आहे.’

‘विस्मरण हे म्हातारपणाचे लक्षण नसून आजार आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच न्यूरॉलॉजिस्ट किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा,’ असे मनोविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य पाटील म्हणाले. ‘वयानुसार मेंदूच्या पेशींचा होणारा ऱ्हास आणि ब्रेन स्ट्रोक ही डिमेन्शियाची मुख्य कारणे असू शकतात. मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि सतत काही तरी नवीन शिकत राहणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अरविंद पंचनदीकर यांनी नमूद केले.

‘एआय’ आणि डिमेन्शियाचा संबंध नाही

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी ‘एआय’चा वापर आणि डिमेन्शियाचा थेट संबंध जोडता येत नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. ‘एआय’चा वापर हे नवीन कौशल्य शिकणे आहे. त्यामुळे त्याच्या वापरामुळे डिमेन्शियाचा धोका वाढतो, असे म्हणता येणार नाही. उलट, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि कॉग्निटिव्ह ॲपच्या माध्यमातून डिमेन्शियाच्या रुग्णांवर उपचार करणे, त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करणे आणि संशोधनाला चालना देणे शक्य आहे.

डिमेन्शियाची प्राथमिक लक्षणे

  • नुकत्याच घडलेल्या घटना किंवा बोललेले न आठवणे.
  • तेच तेच प्रश्न, वाक्ये वारंवार उच्चारणे.
  • छोटे छोटे हिशेब करण्यात अडचण येणे.
  • परिचित ठिकाणी गेल्यावरही रस्ता किंवा ठिकाण पटकन न आठवणे.
  • योग्य शब्द आठवण्यात आणि नेमकेपणाने बोलण्यात अडचण येणे.
  • व्यक्तिमत्त्वात बदल, चीडचीड किंवा भावनिक असंतुलन जाणवणे.

मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी…

  • चाळिशीपासूनच स्वतःसाठी शांत वेळ देणे.
  • कुटुंबीयांशी नियमित संवाद आणि प्रत्यक्ष भेटीगाठी.
  • छोटी घरगुती कामे स्वतः करून हात आणि मेंदू सक्रिय ठेवणे.