दर वर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश. ‘मंथन हेल्दी माइंड’ ही याच क्षेत्रात कार्यरत संस्था. संस्थेच्या संस्थापक आणि समुपदेशक यशश्री हुद्दार यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला हा संवाद.

संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रात कोणते कार्य करते?

स्वप्ना असेरकर आणि मी, आम्ही दोघी शालेय समुपदेशक म्हणून कार्यरत होतो. आमच्या दोघींच्या विचारांचा धागा हा समुपदेशन हाच असल्यामुळे आम्ही मिळून ही संस्था करोनाकाळात सुरू केली. त्या वेळी संपूर्ण जगालाच औषधोपचारांबरोबर मानसिक आधाराचीही गरज होती. त्या वेळी दूरदृश्य प्रणालीचा आणि समाज माध्यमांचा उपयोग आम्ही केला. आजही या दोन्हींचा सुयोग्य वापर करून आम्ही दर महिन्याला ‘मनोमेनू’ या उपक्रमाचे आयोजन करत आहोत. त्याचबरोबर वैयक्तिक समुपदेशनापासून विविध वयोगटांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन, मानसशास्त्रीय संकल्पना मराठीतून पोहोचविणे, तसेच ‘डिमेन्शिया’बाबत जनजागृती करण्याचे कार्य ‘मंथन’च्या माध्यमातून केले जाते.

‘डिमेन्शिया’बाबतची जनजागृती कशा प्रकारे करता?

विस्मरणाच्या आजाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून ‘भूली यादें’ या पथनाट्याचे सादरीकरण केले जाते. ज्येष्ठ समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ नीता केळकर यांच्यामुळे माझी वृद्धकल्याणशास्त्राच्या अभ्यासक डाॅ. मंगला जोगळेकर यांच्याशी ओळख झाली. त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये डिमेन्शिया, पार्किन्सन्स यांसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींबरोबर काम करत आहेत. डिमेन्शियाबद्दल जनजागृती अतिशय कमी असल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवली. आपण यात काही करू शकतो, असा विचार करता या संदर्भात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित प्रसंगनाट्य सादर करावे, असे विचारांती ठरवले आणि त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. मला पहिल्यापासून अभिनयाची आवड असल्यामुळे मी या पथनाट्याचा एक अविभाज्य भाग झाले. माझ्यासारख्याच अभिनयाची आवड असणाऱ्या नीता केळकर, अनुजा केळकर आणि सुचेता बापट या तिघीदेखील या पथनाट्यामध्ये सहभागी झाल्या. पुढे आमच्याबरोबर डॉ. श्रुती दातार, अनघा लघाटे, यांचीदेखील साथ मिळाली. त्यातून आम्ही ‘भूली यादें’ या नावाने पथनाट्याद्वारे ‘डिमेन्शिया’ जनजागृतीचे काम सुरू केले. कमीत कमी १५ ते जास्तीत जास्त ५०० इतकी प्रेक्षक संख्या असलेल्या प्रेक्षकांसमोर आम्ही पुण्याबरोबरच अलिबाग, बारामती, अहमदाबाद येथे गेल्या काही महिन्यांमध्ये पंचवीसहून अधिक प्रयोग सादर केले. अतिशय ज्वलंत विषय असूनही या आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे अशा आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अर्थातच वेगळा असतो. केवळ शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही याचे प्रमाण बरेच आहे. पण, आम्ही अजून ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकलेलो नाही.

महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणते उपक्रम राबवता?

‘स्त्रियांच्या निर्णय क्षमतेत होत गेलेले बदल’ या विषयावर गेल्या वर्षी काही करायचे ठरले आणि त्यावर ‘आनंदी मी, सावित्री मी’ या पथनाट्याची निर्मिती केली. याचे लेखन नीता केळकर व सहलेखन स्वप्ना असेरकर व मी केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील परावलंबी स्त्री ते आताची निर्णयक्षम खंबीर स्त्री हा प्रवास या पथनाट्यातून दाखवला जातो. या पथनाट्याचे आतापर्यंत सात प्रयोग झाले. आम्ही जनजागृतीसाठी केलेली ही दोन्ही पथनाट्ये सेवा म्हणून सादर करतो.

भविष्यातील योजना काय आहे?

‘वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ’ या महासंघाने यंदा मानसिक आरोग्याचा सामना केलेल्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष अनुभवांना आणि त्यांच्या आवाजाला महत्त्व देणे, यावर कार्य करण्याची घोषणा केली असून, आमचे कार्य याच घोषणेच्या आधारावर सुरू आहे. भविष्यात हे कार्य वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. shriram.oak@expressindia.com