इंटरनेट व मोबाइलच्या जमान्यामध्ये टपाल व्यवस्थेतून पत्र पाठविणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने टपाल खात्याच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना टपाल विभागाने इतर सेवांकडे लक्ष केंद्रित करून हे प्रश्नचिन्ह खोडण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांपर्यंत पार्सल पोहोचविण्यासाठी अॅमेझॉन व स्नॅपडील या ऑनलाइन खरेदी संकेतस्थळांबरोबर करार करून त्या माध्यमातून पुणे विभागात केवळ दीडच महिन्यात दररोज ५०० पार्सल पोहोचविण्यात येत आहेत. ही संख्या वाढतच आहे. त्यासह जीवन विमा घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये तब्बल २०४ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असल्याने या सेवांनी टपाल खात्याला तारले आहे.
जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पुणे विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या पाश्र्वभूमीवर पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल गणेश सावलेश्वरकर यांनी टपाल खात्याच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. अॅमेझॉन व स्नॅपडील या कंपन्यांशी देशपातळीवर करार करण्यात आला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून टपाल खात्याकडून नागरिकांपर्यंत पार्सल पोहोचविण्यात येतात. ही व्यवस्था सुरू करून दीड महिना झाला असला तरी या व्यवस्थेला पुणे विभागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या पुण्यात दररोजच्या पार्सलची संख्या ५०० असली, तरी सणासुदीच्या काळात ही संख्या पाच हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
टपाल विभागामार्फत पत्र पाठविणाऱ्यांची संख्या खूपच घटली आहे. मात्र, स्पीड पोस्ट या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याबरोबरीनेच बचत खाती व जीवन विम्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टपाल कार्यालयांमध्ये पुन्हा एकदा लगबग सुरू झाली आहे. याबाबत सावलेश्वरकर म्हणाले, पार्सल व्यवस्थेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही व्यवस्था सध्या मुख्य टपाल कार्यालयात उपलब्ध आहे, मात्र वाढता प्रतिसाद पाहता पुढील काळात सिटी पोस्ट, शिवाजीनगर टपाल कार्यालयातही ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लोणावळा, पंढरपूर, सोलापूर, शिर्डी या ठिकाणीही पार्सल सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
 आयटीतील पार्सलला कंपन्यांचा खोडा
पार्सल मागविणाऱ्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, पार्सल त्यांच्यापर्यंत मिळत नाही किंवा वेळेनंतर पोहोचते, याबाबतच्या तक्रारींबाबत गणेश सावलेश्वकर म्हणाले, अनेक आयटी कंपन्यांमध्ये संरक्षणाच्या कारणास्तव पोस्टमनला आत सोडले जात नाही. त्यामुळे कंपनीच्या व्यक्तीकडे पार्सल दिले जाते. त्यातून ते संबंधितापर्यंत वेळेत पोहोचत नाही. या कंपन्यांना आम्ही मेल रूमची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मात्र, कंपन्यांकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही.

पुढील वर्षी वारीत ‘मोबाइल पोस्ट ऑफिस’
आळंदी व देहू येथून निघणाऱ्या पालख्यांसमवेत पुढील वर्षांपासून टपाल विभागाच्या वतीने ‘मोबाइल पोस्ट ऑफिस’ची सुविधा देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन सध्या करण्यात येत आहे. या व्यवस्थेमध्ये तीन ते चार लोकांचे पथक काम करणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक कार्यालयातील कर्मचारीही या व्यवस्थेला मदत करतील, असे सावलेश्वरकर यांनी सांगितले. आदर्श संसद ग्राम योजनेमध्ये खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये संपूर्ण बचत ग्राम व संपूर्ण डाक ग्राम योजनाही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टपाल दिनानिमित्त उपक्रमांची रेलचेल
जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पुणे विभागामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची टपाल कार्यालयाला भेट, कर्मचाऱ्यांना ‘सॉफ्ट स्कील’, सार्वजनिक संवाद कौशल्य व सामान्य सौजन्याबाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १० ऑक्टोबरला बचत दिन, १२ ऑक्टोबरला टपाल दिन, १३ ऑक्टोबरला फिलाटेली दिन, १४ ऑक्टोबरला टपाल जीवन विमा दिन व १५ ऑक्टोबरला व्यवसायवृद्धी दिन होणार आहे.