नारायणगाव : खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) येथे २८ फेब्रुवारी ते एक मार्च रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कालावधीत वैज्ञानिक प्रकल्प नागरिक आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. समारोप एक मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता कृषी महाविद्यालयचे सह अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती ‘जीएमआरटी’चे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अधिष्ठाता प्रा. ईश्वरा चंद्रा, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे आदी उपस्थित होते.

प्रा. यशवंत गुप्ता म्हणाले, ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थेने खोडद येथे उभारलेली ‘जीएमआरटी ही एका विशिष्ट प्रकारातील जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण आहे. या संस्थेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गेल्या २४ वर्षांपासून वैज्ञानिक प्रकल्प नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात संस्था, शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होत असतात. शाळा आणि महाविद्यालय यांना गणित, भौतिक, रसायन आणि जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना खगोल शास्त्रज्ञांची थेट संपर्क साधून प्रश्न विचारता येतील.

तंत्रज्ञानी बनवलेल्या विज्ञानविषयक लघुपट, वैज्ञानिक बलूनचे उड्डाण आणि त्याचे प्रयोग दाखविण्यात येणार आहेत. ‘या प्रदर्शनामध्ये विविध पुस्तके, वैज्ञानिक खेळणी उपलब्ध आहेत. शिवाजीनगर येथून नारायणगाव आणि पुढे खोडदला येण्या-जाण्यासाठी एटीच्या बसची सुविधा करण्यात आली असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी सांगितले.