पुणे : ‘स्वच्छ पुणे हा युवकांचा संकल्प’, ‘स्वच्छतेची सुरुवात युवकांकडून’, ‘स्वच्छ पुणे संकल्प २०२६’ असे फलक हाती घेऊन युवकांसह पाच हजार पुणेकरांनी शनिवारी नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली. ‘माय रिव्हर, माय व्हॅलेंटाइन’ या उपक्रमांतर्गत ही मोहीम पार पडली.
वर्शिप अर्थ फाउंडेशनतर्फे भिडे पूल परिसर, नवी पेठ, मुठा नदी पात्र येथे ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या श्यामला देसाई यांना यंदाचा मुळा-मुठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या उपक्रमाद्वारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, तसेच पुणेकर नागरिक सहभागी झाले होते. फाउंडेशनचे संस्थापक पराग मते, आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, दिनेश कदम, विद्यार्थी प्रतिनिधी हार्दिक सोनवणे, दुर्गेश बलके, कौस्तुभ येवले, ओंकार घुले उपस्थित होते.
सकाळी लवकर उठून अजित पवार आपल्या कामाला सुरुवात करत होते. त्याच पद्धतीने सकाळी मुठा स्वच्छता अभियान राबवत तरुणांनी त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी), एनएसएस विभाग, तसेच केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. नदी स्वच्छता मोहीम, रील स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
‘नदी स्वच्छतेसाठी केवळ एकदिवसीय मोहिमा पुरेशा नाहीत. म्हणूनच आम्ही शिपको कंपनीच्या सहकार्याने मुठा नदीमध्ये ‘ट्रॅश बूम’ ही शाश्वत व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे नदीत वाहून येणारा प्लास्टिक कचरा, निर्माल्य, फुले, नारळ, तसेच इतर तरंगणारा कचरा अडवून त्याचे नियोजनबद्ध संकलन करता येते.
‘ट्रॅश बूम’ ही नदी स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना असून, यामुळे नदीचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपले जाईल. नागरिकांमध्ये नदीसंवर्धनाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला,’ असे वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते यांनी सांगितले.
