पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रशिक्षण मिळणार असून, त्यासाठी विद्यापीठाकडून ‘आयबीएम’ आणि यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, ‘आयबीएम’चे संजीव मेहता, यशस्वी स्किल्स लिमिटेडचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. ‘रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी हा सामंजस्य करार करण्यात आला असून, मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय), ‘मशिन लर्निंग’, ‘सायबर सिक्युरिटी’, ‘ब्लॉक चेन’, ‘डेटा ॲनॅलिटिक्स’ अशा विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,’ असे डॉ. सोनावणे यांनी सांगितल्याचे पत्रकात म्हटले आहे.

‘पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या वापराचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या वर्षात तंत्रज्ञानाच्या वापरावर प्रत्यक्ष भर देण्यात येणार असून, विविध विद्याशाखांत ‘एआय’चा वापर या विषयावरील अभ्यासक्रम आणि पदवीच्या तिसऱ्या वर्षात विविध प्रकल्पांवरील कामाच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार येईल. प्रत्येक वर्षात साठ तास आणि ४ क्रेडिट असे अभ्यासक्रमाचे स्वरूप असेल,’ असे डॉ. सोनावणे यांनी स्पष्ट केले.

‘मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयबीएम’ने साठ तासांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. विविध क्षेत्रांतील बदलणारे तंत्रज्ञान आणि नव्या कार्यप्रणाली यांच्याशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होईल,’ असे डॉ. सोनावणे यांनी नमूद केले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयबीएम’तर्फे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे मेहता यांनी सांंगितले.

विद्यापीठात ‘बीए’ आणि ‘बीकॉम’सह पारंपरिक शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे रोजगाराभिमुख शिक्षण आणि शिक्षणानंतर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.- प्रा. डॉ. संजीव सोनावणे,कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केल्यामुळे ‘आयबीएम’ला तळागाळातील, आर्थिक दुर्बल घटकातील मोठ्या जनसमुदायाशी जोडण्याची संधी मिळाली आहे.- संजीव मेहता, प्रमुख ‘आयबीएन’ इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशन