पुणे : ‘जन्माने ज्यू, आडनावाने मुस्लिम; पण मातृभाषा मराठी. मराठीवर प्रेम करणाऱ्या यास्मिन शेख भाषाप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. भाषेला धर्म नसतो. शेख यांनी आयुष्यभर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले. भाषेच्या नियमांबद्दल कठोर; पण त्याच वेळी मायाळू. भाषाशास्त्र आणि शुद्धलेखनाचे कार्य पुढे नेणे, हीच यास्मिन शेख यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ अशी भावना शुक्रवारी त्यांच्या श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित सभेत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, ज्येष्ठ संपादक भानू काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष योगेश सोमण, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी, साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, माजी प्राप्तिकर आयुक्त संग्राम गायकवाड, प्रा. शेख यांच्या कन्या प्रा. रूमा बावीकर, डॉ. शमा भागवत, नात जुई भागवत आदी या वेळी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, ‘शेख यांच्या व्यक्तिमत्त्वात असे काही होते, की त्या जणू अमरत्व घेऊन आल्या आहेत, असे वाटावे. त्या मराठी भाषेच्या जागरूक संरक्षक होत्या. भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन एवढ्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नाही. त्या खऱ्या अर्थाने मराठी भाषाप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. आता मातृभाषेच्या संरक्षकाच्या भूमिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ देणारा महाप्रकल्प गरजेचा आहे. तीच शेख यांंना खरी आदरांजली ठरेल.’

‘आलेल्या प्रत्येक पत्राला स्वहस्ताक्षरात उत्तर देणे, हे आईला कर्तव्य वाटत असे. अतिशय शिस्तप्रिय, शांत, समाधानी वृत्तीने ती जगली. शब्दकोडी सोडवणे आईला आवडत असे. प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून, निरलसपणे आणि जिव्हाळ्याने करणे, हा तिचा स्थायीभाव तिला माणसांशी जोडून ठेवणारा होता,’ अशी आठवण शेख यांच्या कन्या रूमा बावीकर यांनी सांगितली. दिलीप फलटणकर, डॉ. उज्ज्वला गोखले, डॉ. सागर देशपांडे, के. जी. पठाण, नागेश अंकुश यांनीही भावना व्यक्त केल्या. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘निरपेक्ष प्रेमाचा अखंडित स्रोत’

यास्मिन शेख यांची नात जुई भागवत यांनी आजीबरोबरच्या आठवणी सांगितल्या. ‘माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आजीकडून छान पुस्तकांची भेट मिळत असे. आजी अप्रतिम विणकाम करत असे. तिने माझ्यासाठी विणलेले स्वेटर मला आजही ऊब देतात. आजी निरपेक्ष प्रेमाचा एक अखंडित स्रोत होती. वयाच्या ९० व्या वर्षीही ती कामात व्यग्र होती. असे असणे मलाही आवडेल,’ असेही तिने सांगितले.