पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) शवविच्छेदन विभागात डाॅक्टर कथितरीत्या मद्यपान करून झोपल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात गुरुवारी एक मृतदेह आणण्यात आला. मृतांचे नातेवाईक डॉक्टरांकडे मृत्यूच्या कारणाच्या प्रमाणपत्राची मागणी करत होते. ‘आम्ही रात्रभर थांबलो आहोत. प्रमाणपत्र द्या,’ अशी विनवणी नातेवाईक करत होते. परंतु, मद्यपान करून झोपलेल्या डॉक्टरने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला,’ असे चित्रीकरण समाज माध्यमात प्रसारित झाले आहे. हा प्रकार उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टरला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, तत्काळ खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकारामुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन झाली असून, कर्तव्यावर असताना डॉक्टर मद्यपान करीत आहेत. संबंधित डॉक्टरसह मद्य पार्टीत सहभागी सर्व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली.
वायसीएम’मधील आधीच्या वादग्रस्त घटना
गणेशाेत्सवात ‘वायसीएम’च्या आवारात २२ सप्टेंबर राेजी ढाेलवादन करण्यात आले. या प्रकरणी वरिष्ठ डाॅक्टरांसह सहा जणांवर गुन्हा.
त्यानंतर काही दिवसांतच अन्य घटनेत सहकारी डाॅक्टरचा अपमान केल्याप्रकरणी अधिष्ठात्यावर गुन्हा
वायसीएम रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून एका बेवारस रुग्णाला घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा अचानक उघडला गेला आणि रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर पडल्याची घटना १० ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेला रुग्णवाहिकाचालक आणि कक्ष सेवकाला (वाॅर्ड बाॅय) निलंबित करण्यात आले.
संबंधित डॉक्टरला नोटीस दिली असून, तत्काळ खुलासा मागितला होता. विभागप्रमुखांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार डॉक्टरला निलंबित करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.
