पुणे : दस्तुरखुद्द ‘जीएं’नी रेखाटलेल्या तैलचित्रांचे प्रदर्शन, साहित्याचे अभिवाचन, सुनीताबाई आणि जीए यांच्या पत्रांवर आधारित अभिवाचन अशा विविध वाड्मयीन उपक्रमांनी ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची जन्मशताब्दी वर्षभर राज्यातील विविध शहरांसह बृहन्महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. 

जीएंच्या जन्मशताब्दी वर्षाला रविवारपासून (१० जुलै) प्रारंभ सुरुवात आहे. त्या निमित्ताने वर्षभर जी. ए. कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वाड्मयीन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठीवडेकर , डॅा. वंदना बोकील कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या. अनंत खासबारदार यांनी जन्मशताब्दीनिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण पैठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

पैठणकर म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण कलादालन येथे रविवारी सकाळी अकरा वाजता जीएंनी रेखाटलेल्या तैलचित्राच्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. ‘झपूर्झा’चे अजित गाडगीळ या वेळी उपस्थित राहणार असून सोमवारपर्यंत (११ जुलै) सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंका‌ळी पाच वाजता जन्मशताब्दी कार्यक्रमाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. उत्तरार्धात चंद्रकांत काळे आणि गजानन परांजपे जीएंच्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत.

आरभाट फिल्म् निर्मित सुनीताबाई देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रावर आधारित ‘रुंग्ली  रुंग्लीयॉट’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम सोमवारी (११ जुलै) गिरीश कुलकर्णी आणि माधुरी पुरंदरे सादर करणार आहेत. त्याचे संकलन आणि दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांचे आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. जन्मशताब्दीनिमित्त जीएंच्या सर्व पुस्तकांचा संच वर्षभर २५ टक्के सवलतीमध्ये वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रसिका राठिवडेकर यांनी सांगितले.