scorecardresearch

येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीला सुरूवात; ऑनलाइन बाजारपेठही मिळवून देण्याचा शासनाचा मानस

आपल्याला दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तूंचे उत्पादन येरवडा कारागृहातील कैदी तयार करत असतात. यंदाच्या दिवाळी सणानिमित्त या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आज उदघाटन झाले आहे.

Yerwada exhibition
येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळी सणानिमित्त प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

येरवडा कारागृहातील कैद्यामार्फत तयार केलेल्या वस्तूंची विक्री येथील दालनात वर्षभर होत असते. कैद्यांकडून उत्तम दर्जाच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. करोना महामारीच्या काळात सर्वाधिक नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कैद्यांच्या वस्तू ऑनलाइन कशा विकता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळी सणानिमित्त प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यातील एक म्हणजे दिवाळी सणानिमित्ताने लागणार्‍या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री स्टॉल सुरू असतात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळण्यास मदत होते. मात्र यामधून कैद्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. ज्यावेळी कारागृहातून कैदी बाहेर पडेल. त्यावेळी त्याच्या हातामध्ये रोजगाराचे साधन असणार, हाच आमचा उद्देश या प्रदर्शनातून आहे. त्यामुळे प्रदर्शनाचा लाभ पुणेकर नागरिकांनी अधिकाधिक घ्यावा,असे आवाहन देखील त्यांनी केले.

आपल्याला दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तूंचे उत्पादन येरवडा कारागृहातील कैदी तयार करत असतात. यंदाच्या दिवाळी सणानिमित्त या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आज उदघाटन झाले आहे. त्यामध्ये कंदील, पणत्या, सागवानी लाकडी वस्तू, पैठणी, कुर्ता, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी यासह ७० वस्तू प्रदर्शनात माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यंदा जवळपास १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न होईल, असा अंदाज येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 16:03 IST
ताज्या बातम्या