पुणे : महिलेची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. ख्वाजा नुरुद्दीन टिनमेकर (वय ५४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय महिला येरवड्याील लक्ष्मीनगर परिसरातून निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक ख्वाजाने महिलेला अडवून तिची छेड काढली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो पसार झाला. महिलेने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस कर्मचारी जाधव तपास करत आहेत.

दरम्यान, घरासमोर खेळणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराची दहा वर्षांची मुलगी घरासमोर ४ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास खेळत होती. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

‘तू मला आवडते’, असे तो तिला म्हणाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक महाडिक तपास करत आहेत.

पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी बलात्काराचे ४७३ गुन्हे, तसेच विनयभंगाचे ८३६ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा विचार केल्यास सर्व गुन्हे ओळखीतील आरोपींनी केल्याचे निदर्शनास आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी त्वरीत नोंदवून घेणे, तसेच बालकांवरील अत्याचाराच्या घटनांची नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. बलात्कार, विनयभंगाची आकडेवारी विचारात घेतल्यास अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून घेण्यास प्राधान्य दिले जात आहे.

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि आरोपीची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याच्याकडे वेळोवेळी विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बैरागी तपास करत आहेत.