पुणे : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मानसिक आजाराबरोबरच रुग्णांच्या शारीरिक व्याधींवरही रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. येत्या दोन वर्षांत येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात अतिदक्षता विभाग आणि शल्यचिकित्सा विभाग सुरू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असून, ही सेवा देणारे हे राज्यातील पहिले आणि देशातील दुसरे रुग्णालय ठरेल.

येरवडा मनोरुग्णालयात सध्या सुमारे एक हजार रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये सुमारे ४० टक्के रुग्णांना कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधी जडल्या आहेत. स्वतःच्या आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयी या रुग्णांमध्ये जागरूकता नसते. हे रुग्ण साधारण ५० वर्षांपुढील असून, ते मधुमेह, उच्च रक्तदाब, एचआयव्ही, हृदयविकारासारख्या आजारांशी झुंज देत आहेत.

भांडणे, भिंतीवरून वा झाडावरून उडी मारणे यांमुळे अनेक रुग्णांना गंभीर शारीरिक इजा होतात. अशा वेळी या मनोरुग्णांना ससून सर्वोपचार केंद्र किंवा औंध जिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार करावे लागतात. दर महिन्याला किमान सात ते आठ मनोरुग्णांना उपचारांसाठी या शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागते. तेथे वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब लागतो. शिवाय अशा रुग्णांना हाताळणे बाहेरच्या रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांसाठी तारेवरची कसरत बनते. त्यामुळे मनोरुग्णालयातच उपचारांची व्यवस्था करण्याबाबत अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सा विभागासाठीचा प्रस्ताव आहे.

मनोरुग्णालयाच्या आवारात सुमारे ४० हजार चौरस फूट जागेवर इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीने सुसज्ज १० खाटा आणि दोन शल्यचिकित्सा विभाग असणार आहेत. सध्या येरवडा मनोरुग्णालयात जनरल फिजिशियन, परिचारिका असा मर्यादित वैद्यकीय कर्मचारी वर्ग आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विविध तज्ज्ञ आणि कुशल तंत्रज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.

राज्यात पुण्यासह ठाणे, चिपळूण आणि नागपूर या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये असून, गेल्या काही दिवसांपासून येरवडा प्रादेशिक रुग्णालयात पाच ऑक्सिजन खाटांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अतिदक्षता विभाग आणि शल्यचिकित्सा विभाग हे महत्त्वाचे प्रकल्प असून, याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षांत ही इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे मनोरुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे. डॉ. श्रीनिवास कोलोड अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे</strong>

बंगळुरूमध्ये केंद्र सरकारची राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान संस्था अर्थात ‘निमहॅन्स’ ही संस्था असून, याच धर्तीवर येरवड्यामधील प्रादेशिक मनोरुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक अतिदक्षता विभाग आणि शल्यचिकित्सा विभाग उभा राहणार आहे. या उपक्रमाला लवकरच मंजुरी मिळेल. डॉ. सुनीता गोल्हाईत अतिरिक्त संचालक, महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य विभाग